ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : लग्नसमारंभ म्हटलं की अनेकदा काही गोष्टी आपोआपच विचारांमध्ये डोकावून जातात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे लग्नाची वरात. नववधूला वाजतगाजत आपल्या दारी आणत तिला कायमस्वरुपी लक्षात राहील असं स्वागत करण्याकडे अनेक कुटुंबांचा कल असतो. अशा या लग्नसमारंभांच्या दिवसांमध्ये एका शेतकऱ्यानं या स्वागतसोहळ्याच्या बाबतीत चांगलीच बाजी मारली आहे. त्यानं असं काही केलं आहे की, लेका शेतकऱ्याचा नाद करायचा नाही! असंच पाहणारे आणि पंचक्रोशीतले गावकरी म्हणत आहेत. (Wedding Video)
ही गोष्ट आहे एका हौसेची आणि त्या हौसेपायी केलेल्या हेलिकॉप्टरस्वारीची. धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं हौस म्हणून मुलाच्या लग्नाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरने काढली.
धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंतरवली गावातील शेतकरी भास्कर शिकेतोड या शेतकऱ्यांनं मुलाच्या लग्नासाठी थेट हेलिकॉप्टर आणला. शिकेतोड यांचा मुलगा आकाश याचा शुभविवाह अस्मिता नावाच्या वधूसोबत नुकताच पार पडला. या लग्नात नवरदेवाची मिरवणूक थेट हेलीकॉप्टरने काढण्यात आली.
भास्कर शिकेतोड यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नातही हेलिकॉप्टरमधुन मिरवणूक काढली होती. शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नात त्यांची मिरवणूक त्या काळात मोटारसायकलवरुन काढण्यात आली होती. माञ मुलांच्या लग्नात हेलीकॉप्टरने मिरवणूक काढायची असंच शेतकरी शिकेतोड यांनी ठरवलं होत. बस्स, मग काय? ही हौसही त्यानी भागवली.
सासरेबुवांची हौस आणि लग्नाच्या खास दिवशी झालेलं ग्रँड स्वागत पाहूनने नववधू पुरती भारावून गेली होती. धाराशिवमधील या अनोख्या विवाह सोहळ्याची पंचक्रोशीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. इतकंच नव्हे, तर सोशल मीडियावरही या खास क्षणांचे व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहेत. लग्नाचे असंख्य व्हिडीओ आणि रील सोशल मीडियावर प्रचंजड व्हायरल होत असतानाच महाराष्ट्रातील हा व्हिडीओसुद्धा अनेकांचीच पसंती मिळवताना दिसत आहे. तुमच्या फीडमध्ये दिसला का हा व्हिडीओ?