Dharashiv : धाराशिवमध्ये शिष्यवृत्तीच्या परीक्षेतच सामूहिक कॉपी करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. अनेक विद्यार्थ्यांना एकसमान गुण मिळाल्यामुळे यात संशय आला. एकाच परीक्षा केंद्रावरील मुलांना एकसमान गुण मिळालेत. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या परीक्षेतच सामूहिक कॉपी झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
सरकार राज्यभरात कॉपीमुक्त अभियानाचा डंका वाजवत असतानाच या मोहिमेला सपशेल अपयश आलं आहे. केंद्र सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत धाराशिवमध्ये मास कॉपी झाल्याचा आरोप होतोय. 215 पैकी 125 विद्यार्थी एकाच केंद्रावरील असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यातच एका केंद्रावरील 78 विद्यार्थ्यांना एकसमान गुण मिळाल्याचा दावा करण्यात येतोय. शिष्यवृत्तीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचे प्रकार पुढे आल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत मास कॉपी?
- धाराशिवमध्ये 653 विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षा
- एका केंद्रावर 78 विद्यार्थ्यांना एकसमान गुण
- 215 पात्र विद्यार्थ्यांपैकी 125 एकाच केंद्राचे
- शिक्षण विभागाने सखोल चौकशी करण्याची मागणी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. लोहारा तालुक्यातील विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले आहेत. त्यामुळे संशय बळावल्यानं हा सामूहिक कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. याची चौकशी करावी. तसंच संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक महासंघानं शिक्षण विभागाकडे केली आहे.
दरम्यान, झी २४तासच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे. मास कॉपी प्रकरणी 5 जणांची चौकशी समिती स्थापन करण्यात आलीय, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी दिली आहे. शिक्षण विभागाची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना त्यांनी तंबी दिली आहे. 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे समितीला आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास तत्काळ कारवाई करणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
दुर्बल घटकातील होतकरू मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं हा शिष्यवृत्तीमागील मुख्य उद्देश आहे. मात्र दुर्दैवानं याही परीक्षांमध्ये कॉपी झाल्यास योग्य त्या घटकाला न्याय मिळणं दुरापास्त आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा सरकारचा हेतू आहे. शिष्यवृत्तीच्या परीक्षेत सामूहिक करणा-यांना धडा शिकवला जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलं आहे.