विशाल करोळे, झी मीडिया, तुळजापूर : (TuljaBhavani Temple godess talwar) तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजा-यांनी केलाय. मंदिर संस्थांच्या खजाना खोलीत ही तलवार होती मात्र ती तलवार गायब झाली असून तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा दावा पुजाऱ्यांनी केला आहे.
तुळजाभवानीच्या आठ आयुधातील शास्त्राची तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून तलवार गायब केल्याचा या पुजा-यांचा आरोप आहे. मंदिरात सुरू असणा-या कामाला व्यत्यय येऊ नये म्हणून पद्मश्री गणेश द्रविड यांच्या हस्ते मंदिरात विधीवत पूजा करण्यात आली होती. या पूजेद्वारे शस्त्रातील तत्त्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकल्यांचा आरोपही पुजाऱ्यांनी केला आहे. भक्तांना दर्शन घेण्यासाठी, गहाळ झालेली तलवार तुळजाभवानी देवीजवळ किंवा मंदिरात कुठेही ठेवावी अशी मागणी पुजाऱ्यांनी केली आहे.
तुळजाभवानी मंदिरातील पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम यांनी माध्यमांशी संवाद साधत दिलेल्या माहितीनुसार मंदिर संस्थानला अर्ज देऊन तलवार कुठे आहे असा प्रश्न केला असता, संस्थानकडून यासंदर्भातील कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. 'आमच्या माहितीनुसार ही तलवार मंदिराबाहेर कुठेतरी ठेवण्यात आली आहे, त्यामुळं ती तलवार तात्काळ मंदिर संस्थाननं आणून देवीजवळ ठेवावी, जेणेकरून भाविकांना त्या तलवारीचंही दर्शन घेता येईल', असं ते म्हणाले.
सध्या या प्रकरणाचं गांभीर्य पाहता यावरून मोठं वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुळजाभवानी मंदिरात भाविक दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठीसुद्धा ही तलवार श्रद्धास्थानी असून, ती मंदिराबाहेर गेली असल्याचा आरोप पुजारी मंडळानं केल्यामुळं आता मंदिर प्रशासन सावध पवित्रा घेताना दिसत आहे. तलवारीची माहिती घेऊनच पुढे सांगितलं जाईल अशी भूमिका मंदिर संस्थाननं घेतली आहे. मात्र पुजाऱ्यांनी मात्र या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे, ही तलवार गहाळ झाली कशी? ती मंदिराबाहेर आहे तर नेमकी कुठे ठेवली? असे संतप्त प्रश्न पुजारी आणि भाविकही उपस्थित करत आहेत.