गजानन देशमुख (प्रतिनिधी) हिंगोली : शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपदाची स्वप्न पडू लागली आहेत. महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांची विकेट पडणार असा दावा सामनातून करण्यात आलाय. त्याला काही तास होतायत तोच बांगर यांनी मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास आपल्यालाही मंत्रिपद मिळेल अशी आशा व्यक्त केलीये. त्यामुळे मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चांनंतर बांगरांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचं पाहायला मिळतंय.
शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोषभाऊ बांगर यांना आता थेट मंत्रिपदाची स्वप्न पडू लागलेत. आणि त्यांची असलेली मंत्रिपदाची इच्छा काही लपून राहिलेली नाही. मंत्रिमंडळात फेरबदल होणार.... महायुतीच्या 8 मंत्र्यांची विकेट पडणार असा दावा सामनामधून करण्यात आला. या दाव्याला काही तास उलटतायत तोच संतोषभाई बांगर लालदिव्याची स्वप्नं रंगवू लागलेत. महायुतीत सगळं अलबेल आहे. काही फेरबदल होणार नाही असा दावा बांगर यांनी केला खरा, मात्र हे बोलत असतानाच त्यांचं मंत्रिपदाचं स्वप्न हळूच पोटातून ओठावर आलं आणि त्यांनी फेरबदल झालाच तर मलाही एखादं मंत्रिपद देतील असा ठाम आशावाद त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : Ambulance च्या नावे 800 कोटींचा घोटाळा, शिंदेचा खासदारपुत्र लाभार्थी? राऊतांना भलताच संशय
बोलघेवडे वादगस्त चेहरे मंत्रिमंडळातून बाहेर काढणार असा दावा सामनानं केलाय. आता संतोष बांगर यांचा इतिहास म्हणजे वेगवेगळ्या वादांनी भरलाय. त्यांच्या धमक्यांचे फोन सोशल मीडियावर व्हायरल आहेत. कावड यात्रेतला त्यांच्या धिंगाण्याची थेट मुंबईत चर्चा आहे. आता आधीच झालं थोडं त्यात संतोष बांगंरांचं घोडं असं कोण करुन घेईल. पण स्वप्नं पाहायला कुणाला मनाई नाही. संतोष बांगर यांचा तर मंत्रिपदाचं स्वप्न पाहण्याचा हक्कच आहे. नेहमी वादात सापडणा-या मंत्र्यांची डोकेदुखी महायुतीच्या तीन नेत्यांना आहे. त्यात आता संतोष बांगर यांना मंत्रिपद मिळालं तर भरुन पावलं म्हणायचं अशी चर्चा शिवसेनेतच आहे. संतोषभाऊंनी इच्छुकांच्या रांगेत आपलं घोडं दामटलं आहे. मुंगेरीलालसारखे संतोषभाऊंच्या हसीन सपनो की चर्चा पूर्ण हिंगोलीभर आहे.