Ashadhi Ekadashi 2025 Dnyaneshwar Maharaj Palkhi : आळंदीहून निघालेली माऊलींची पालखी असंख्य वारकरी आणि दींड्यांच्या साथीनं आता पंढपूरच्या सीमेवर पोहोचली असून, तत्पूर्वी या वारीत काही असे क्षण सर्वांनीच अनुभवले, की जणू वारीत येणं सार्थकी लागलं. नुकतंच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं ठाकुरबुवा समाधी इथं गोल रिंगण पार पडलं आणि त्यानंतर एक अतिशय भावनिक क्षण वारीत असणाऱ्य़ा प्रत्येकानं अनुभवला. हा क्षण होता बंधूभेटीचा.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत सोपानकाका महाराज यांच्या पालख्या आमनेसामने आल्या आणि वारकऱ्यांनी टाळमृदुंगाचा एकच गजर सुरू केला. पालख्यांचे अश्व दर्शनासाठी पुढे आले. पालखीची आणि या बंधुभेटीची एक झलक पाहण्यासाठी तिथं असणाऱ्या प्रत्येकाची धडपड सुरू होती. हा सोहळा इतका भावनिक की काही वारकऱ्यांना ही बंधूभेट पाहून आनंदाश्रूही रोखता आले नाहीत.
बंधूभेट झाली त्या क्षणी माऊलींच्या पालखीतील विश्वस्तांनी सोपानदेव महाराजांच्या पालखीच्या मानकऱ्यांना मानाचा नारळ देत सहृदय भेट दिली. हा अतिशय संस्मरणीय सोहळा पाहून तिथं असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असंख्य भावना दाटून आल्या आणि विठ्ठलाच्याच नावाचा धावा सर्वांनी केला. पुढे माऊलींची पालखी भंडीशेगाव इथं मुक्कामी पोहोचली तर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनं बोरगाव इथून प्रस्थान ठेवलं.
ज्ञानेश्वर माऊलींची पालखी शनिवारी पंढरपूर सीमेवरील वाखरी या गावात दाखल होईल. भंडीशेगावाचा निरोप घेऊन माऊलींची पालखी वाखरीमध्ये मुक्कामी असेल. ज्यानतंर दुसरं उभं रिंगण – बाजीराव ची वीर इथं पार पडेल. अखेरचं आणि सर्वात मोठं गोल रिंगण वाखरी इछं पार पडेल. या रिंगणासाठी लाखो वारकरी आणि गावकरी उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, संत तुकाराम महाराज यांची पालखीही आज वाखरीमध्ये दाखल होईल. तुकोबांचे उभे रिंगण शनिवारी पार पडेल.