Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मलेशियात अपहरण झालेले डोंबिवलीकर तरूण सुखरूप परतले

कंपनी बॉससह बैठकीसाठी बोलावण्याच्या बहाण्याने या दोघांचं अपहरण करण्यात आलं. 

मलेशियात अपहरण झालेले डोंबिवलीकर तरूण सुखरूप परतले

मुंबई : मलेशियात झालेलं डोंबिवलीकर तरुणांचं अपहरण हे व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याची शक्यता व्यक्त होतेय. अपहरण झालेले रोहन आणि कौस्तुभ वैद्य ८ दिवसांनी शुक्रवारी सुखरूप घरी परतले. फ्रोजन फिशचा व्यवसाय करणाऱ्या या दोघांना मलेशियातल्या लॅकिन्स मरीन नावाच्या कंपनीनं मोठ्या ऑर्डरची बतावणी करत मलेशियाला बोलावलं. मात्र मलेशियात पोहचल्यावर कंपनीच्या माणसांऐवजी या दोघांना अपहरणकर्ते भेटले. कंपनी बॉससह बैठकीसाठी बोलावण्याच्या बहाण्याने या दोघांचं अपहरण करण्यात आलं.

शारीरिक छळ 

अपहरणानंतर या दोघांचा प्रचंड शारीरिक छळ करण्यात आला. त्यांच्या हातापायाला आणि डोळ्यावर टेप लावण्यात आली होती. तसंच अपहरणकर्ते तमिळ भाषेत बोलत होते. त्यामुळे ते भारतीय वंशाचे असावेत अशी शक्यता वर्तवली जातेय. अपहरणकर्त्यांकडून डोंबिवलीत त्यांच्या घरी फोन करुन एक कोटी रुपये खंडणी मागायला सांगायचे तसंच बोलताना इंग्रजीत बोलण्याची अटही दोघांना घालण्यात आली होती. 

चार दिवस छळ केल्यानंतर मलेशिया, थायलंड, फिलिपाईन्स आणि कंबोडिया या चार देशात पुन्हा दिसू नका, अशी धमकी देत त्यांना सोडून देण्यात आलं. केवळ दैव बलवत्तर, म्हणूनच आपली मुलं आपल्याला सुखरूप परत मिळाली, अशी भावना कुटुंबियांनी व्यक्त केलीये. 

Read More