Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

लातूरच्या डोंगरात ड्रग्जची फॅक्टरी, मुंबईच्या ड्रग्जप्रकरणी DRIचा लातूरमध्ये छापा

Latur : लातूरच्या डोंगरात ड्रग्ज फॅक्टरी चालवली जात होती. या फॅक्टरीवर कारवाई करत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिस कर्मचाऱ्यानेच ही फॅक्टरी थाटल्याची माहिती समोर आलीय. 

लातूरच्या डोंगरात ड्रग्जची फॅक्टरी, मुंबईच्या ड्रग्जप्रकरणी DRIचा लातूरमध्ये छापा

वैभव बालकुंदे  (प्रतिनिधी) लातूर : शिक्षणाच्या लातूर पॅटर्नसाठी ओळखला जाणारा लातूर जिल्हा सध्या ड्रग्ज प्रकरणांमुळे चर्चेत आलाय. ‘लातूर पॅटर्न’मुळे देशभरात नावाजलेल्या या शहराचं नाव आता थेट मायानगरी मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाशी जोडलं जातंय. लातूरच्या डोंगरात ड्रग्ज फॅक्टरी चालवली जात होती. या फॅक्टरीवर कारवाई करत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिस कर्मचाऱ्यानेच ही फॅक्टरी थाटल्याची माहिती समोर आलीय. 

लातूरच्या चाकूर तालुक्यातील डोंगरात ड्रग्जची फॅक्टरी चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या DRI च्या पथकाने लातूरमधील रोहिणा परिसरात छापा टाकला होता. या छाप्यात 5 आरोपींना अटक केली होती. तर 2 आरोपींना मुंबईतून ताब्यात घेतलंय. या प्रकरणात मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या प्रमोद केंद्रेचा सहभाग असल्याचं उघड झाला आहे. 

लातूरच्या डोंगरात ड्रग्जची फॅक्टरी : 

1. चाकूर तालुक्यातील रोहिणा गावात ड्रग्जची फॅक्टरी
2. प्रमोद केंद्रे या मुंबई पोलिसांतील कर्मचाऱ्याचा सहभाग उघड झालाय
3. शेतात उभारलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज बनवलं जायचं
4. गुप्त प्रयोगशाळा उभारून मेफेड्रोन ड्रग्ज तयार केलं जात होतं
5. गुप्त माहितीच्या आधारे DRI च्या मुंबई युनिटने छापा टाकला
6. 17 कोटींच्या किमतीचं 11.36 किलो मेफेड्रोन जप्त

अधिक धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत होता. आणि तरीही स्थानिक पोलिसांना याची कानोकानी खबर नव्हती. राज्याच्या ग्रामीण भागातही ड्रग्जचा विळखा पडताना दिसतोय. शिक्षणाच्या पॅटर्नसाठी प्रसिद्ध असेलेल्या लातूरमध्ये थेट ड्रग्जची फॅक्टरी सुरू होती. या सगळ्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हउपस्थित केलं जातं आहे. 

Read More