राज्यात मराठी बोलण्यावरुन वातावरण पेटलं असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' अशी घोषणा दिली आहे. राज्यातील शाळांमध्ये हिंदी शिकवण्यावरुन सुरु झालेला वाद आता मराठी भाषेच्या अस्मितेपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलं पाहिजे असा आग्रह केला जात असतानाच, एकनाथ शिंदे यांच्या एका विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे असणाऱ्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाषण संपवताना 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात' अशी घोषणा दिली. यामुळे आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात' अशी घोषणा दिली.
LIVE पुणे
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 4, 2025
04-07-2025
मा. केंद्रीय गृहमंत्री महोदयांच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभ - लाईव्ह https://t.co/1FHNB2R9vu
"या वास्तूचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी केलं आणि लोकार्पण अमित शहा यांनी केलं. मोदींनी हाती घेतलेले काम नेहमीच पूर्णत्वास जातं. गुजराती बांधव हे लक्ष्मीपुत्रच आहेत. एकता आणि अखंडतेचे हे प्रतीक आहे. अमित शाह हे देशसेवा आणि राष्ट्र सेवा याने समर्पित आहेत. अमित शाह यांनी राष्ट्रहिताला महत्व दिलं आहे. नवीन भारत निर्माण करण्यासाठी मोदींच्या बरोबरीने आहोत. माझ्या निर्णयात अमित शाह दगडासारखे माझ्या मागे उभे होते," असं कौतुक एकनाथ शिंदे यांनी केलं.
"अमित शाह महाराष्ट्राचे जावई आहेत. कारण त्यांच्या होम मिनिस्टर कोल्हापू च्या आहेत. गुजराती बांधवांनी एकजूट कायम ठेवावी राज्याच्या प्रगतीमध्ये तुमचा वाटा आहे," असं सांगत एकनाथ शिंदे यांनी शायरीच्या माध्यमातून अमित शाहांवर स्तुतीसुमनं उधळळी. दरम्यान भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात' अशी घोषणा दिली.