Eknath Shindes: पावसाळी अधिवेशन सुरु असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या दिल्ली दौ-याची महाराष्ट्रभर चर्चा झाली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकनाथ शिंदे गुरुंना वंदन करण्यासाठी दिल्लीत गेले होते का असा अर्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं काढला. तर महाराष्ट्रासाठी निधी आणण्यासाठी शिंदे दिल्लीला गेल्याचा दावा शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलाय.
महाराष्ट्रात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. ऐन अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजधानी दिल्ली गाठली. दिल्लीत शिंदे अमित शाह, राजनाथसिंह आणि नितीन गडकरींना भेटल्याची माहिती आहे. अधिवेशनाच्या काळात एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्यानं महाराष्ट्रात वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या. एकेकाळी आनंद दिघे आणि बाळासाहेबांना गुरु मानणा-या एकनाथ शिंदेंनी आता दिल्लीतला गुरु शोधला का असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लगावलाय.
मुंबईतल्या सिंदूर उड्डाणपुलाचं लोकार्पण झालं या लोकार्पणालाही एकनाथ शिंदे गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीवरुन सारवासारव करताना शिवसेनेच्या नेत्यांच्या नाकीनऊ आल्याचं पाहायला मिळालं.
शिंदेंच्या या दौ-याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यामुळं शिवसेनेच्या नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या दौ-याबाबत सारखं सारखं विचारलं जात होतं. एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा महाराष्ट्रासाठी अतिरिक्त निधी आणण्यासाठी असावा असं सांगायलाही शिंदेंचे शिलेदार विसरले नाहीत.
विरोधकांना मात्र एकनाथ शिंदेंच्या दौ-यामागं काहीतरी वेगळंच शिजत असल्याचा संशय आहे. एकनाथ शिंदे भाजपश्रेष्ठींकडं तक्रार करण्यासाठी दिल्लीत गेले नाही ना असा संशय काँग्रेसनं व्यक्त केलाय. अधिवेशन सुरु असताना सत्ताधारी नेता दिल्लीला जाणं यामुळं सगळ्यांचेच कान टवकारले. त्यात गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठल्यानं शिंदेंची ही गुरुभेट होती का अशी खमंग चर्चा सुरु झालीये.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अनेक आऱोप करण्यात आलेत. विट्स हॉटेलच्या खरेदी प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप शिरसाटांवर झालाय. तर त्यावर उच्च्स्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. आता संजय शिरसाट यांनी आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. 2019 मध्ये निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती आणि 2024 मध्ये तुमची संपत्ती इतकी कशी झाली याचा खुलासा करण्यासंदर्भात आयकरने शिरसाट यांना नोटीस बजावली आहे. स्वतः शिरसाट यांनीच यासदर्भात कबुली दिली आहे. तर काहींनी माझ्याविरोधात तक्रार केली होती. त्यामुळेच आयकर विभागाने नोटीस पाठवल्याचं म्हणत शिरसाट यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. तर आपण नोटीसीला योग्य ते उत्तर देणार असल्याचंही शिरसाट म्हणाले आहेत. तर शिरसाटांच्या संपत्तीसंदर्भात सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचं एमआयएमचे नेते इम्तियाज जलिल यांनी म्हटलंय.. तर पुन्हा एकदा एमआयडीसीतील भुखंडावरून जलिल यांनी संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे.दुसरीकडे आपल्याला आलेल्या आयकरच्या आलेल्या नोटीसीसंदर्भात बोलताना संजय शिरसाट यांनी खासदार श्रीकांत शिंदेंनाही नोटीस आल्याचं विधानही शिरसाट यांनी केलं होतं. मात्र त्यावरून माध्यमांमध्ये बातम्या सुरू झाल्यानंतर संजय शिरसाटांनी घूमजाव केला आहे. मागील काही दिवसांपासून संजय शिरसाट विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. एकामोगोमाग एक असे अनेक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप शिरसाटांवर विरोधकांनी डागले आहे. एकीकडे शिरसाट या आरोपांच्या घेऱ्यात अडकले असतानाच आता त्यांना आयकरची नोटी आलीय. त्यामुळे शिरसाटांच्या पाय आणखी खोलात गेला आहे.