Manikrao Kokate First Comment On Video Of Playing Rummy In Vidhanbhavan: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेमध्ये सभागृहाचं कामकाज सुरु असताना मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता या प्रकरणावर माणिकराव कोकाटेंनी 'झी 24 तास'शी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. या व्हिडीओसंदर्भात अजित पवारांच्या पक्षानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
रमी खेळतानाचा व्हिडिडीओ समोर आल्यानंतर कोकाटेंनी 'झी 24 तास'शी खास बातचीत केली. यावेळेस त्यांना, "तुमचा व्हिडीओ रोहित पवारांनी व्हायरल केला आहे. तुम्ही सभागृहामध्ये रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला जातोय," असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, "त्यावेळी मी कोणाला तरी दाखवत असेल अशा प्रकारे रमीची जाहिरात येते म्हणून" असं कोकाटेंनी म्हटलं.
त्यावर "तुम्ही रमी खेळत असल्याचं त्या व्हिडीओत दिसत आहे," असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर कोकाटेंनी, "असं अजिबातच नाही. मी सभागृहात सहभागी होतो तेव्हा प्रश्नांना गांभीर्याने उत्तरं देतो. गांभीर्याने बसलेलो असतो," असं उत्तर दिलं. हा व्हिडीओ कोणाकडून व्हायरल करण्यात आला आहे? असा प्रश्न कोकाटेंना विचारण्यात आला. त्यावर कोकाटेंनी, "मी कोणाला तरी दाखवत असेल अशाप्रकारे रमीची जाहिरात येते. ती चुकीची आहे. त्यामुळे किती लोकांवर परिणाम होतो, हे मी दाखवलं असेल कोणाला तरी शेजारी," असं उत्तर दिलं.
सत्ताधारी पक्षाचे आमदार तुमच्यामागे बसतात. तर या व्हिडीओबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? या प्रश्नावर कोकाटेंनी "अशी काही शंका असल्याचं कारण नाही. त्या व्हिडीओत मी कोणाला तरी दाखवत होतो की रमीचा जो काही गेम खेळतात त्यामध्ये एजन्सी कशाप्रकारे जाहिरात करतात हे दाखवत असेल," असं उत्तर दिलं. यासंदर्भात थोड्याच वेळात मी खुलासा करतो, असं सांगितलं.
मात्र कोकाटेंनी केलेल्या दाव्याला समर्थन करणारी परिस्थिती व्हिडीओत दिसत नाही. माणिकराव कोकाटेंच्या आजूबाजूला कोणताही सदस्य दिसत नाहीये. माणिकराव कोकाटेंना असा विषय उपस्थित करायचा होता तर तो सभागृहाच्या बाहेर का नाही उपस्थित केला? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7eTAtq
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी यासंदर्भात 'झी 24 तास'शी बोलताना या व्हिडीओमध्ये एआयच्या माध्यमातून छेडछाड करण्यात आल्याचा दावा केला आहे. "त्या व्हिडीओत कोणी तरी एआय केलं आहे. त्यावर माणिकराव स्वत: उत्तर देणार आहेत. ते थोड्याच वेळात आपल्याशी बोलतील," असं सूरज चव्हाण म्हणाले. कोकाटे पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात खुलासा करताना महाराष्ट्राच्या जनतेला माहिती देतील. "तसं कृत्य असेल तर त्यांना अजितदादा त्यांना योग्य ती समज देतील," असं सूरज चव्हाण म्हणाले.