Ujjwal Nikam on Mohsin Shaikh Case : 2014 मधील पुण्यातील मोहसीन शेख झुंडबळी प्रकरणाच्या खटल्यातून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी अचानक माघार घेतली होती. उज्ज्वल निकम खटल्यातून स्वत:हून बाहेर पडल्यामुळे एकच खळबळ झाली होती. त्यावेळी अगदी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निकम यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला होता. तर हिंदुत्ववादी संघटना आणि सरकारने उज्ज्वल निकम यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी त्यावेळी केला होता. पण दुसरीकडे मोहसीनच्या कुटुंबीयांनी मात्र या खटल्यात निकम हेच सरकारी वकील हवेत अशी मागणी केली होती. तरीदेखील उज्ज्वल निकम या प्रकरणापासून लांब राहिले. या खटल्यातून त्यांनी माघार का घेतली याचा गौप्यस्फोट त्यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात केला आहे. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
मोहसीन शेख झुंडबळी प्रकरणाच्या खटल्यातून माघार घेण्यामागे एका खासदाराचं पत्र होतं असे उज्ज्वल निकम म्हणाले. ते या मुलाखतीत म्हणाले की, 2014 मधील पुण्यातील मोहसीन शेख झुंडबळी प्रकरणात मुस्लीम खासदार आणि एका पत्रकाराच्या आक्षेपामुळं माघार घेतली. टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी माघारीवर भाष्य केलं. उज्ज्वल निकम यांना खटला देण्यात आला होता. पण एका मुस्लीम खासदारानं सरकारला पत्र लिहून उज्ज्वल निकम यांनी हिंदुत्ववादी संघटनांकडून सत्कार स्वीकारलाय. त्यामुळं त्यांना खटला देऊ नये अशी भूमिका घेतली. त्या पत्रामुळं आपण माघार घेतल्याचा दावा निकमांनी केलाय.
त्यावेळी त्या मुस्लीम खासदाराचं नाव सांगा असं म्हटल्यावर उज्ज्वल निकम म्हणाले की, मला त्या खासदाराचं नाव माहिती आहे. पण मला कोणमाची बदनामी करायची नाही. त्याच मुस्लीम खासदाराने नंतर माझी क्षमा देखील मागितली. चूक केलं हे मी मुद्दामून चॅनेलसमोर सांगत आहे. त्याने पत्र असं लिहिलं होतं की, उज्ज्वल निकम यांचा सत्कार अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. म्हणून आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. मी ताबडतोब राजीनामा देऊन टाकला. या प्रकरणाचा निकाल गेल्याच वर्षी लागला की, सगळे आरोपी सुटले.
मोहसीन शेख हा तरुण एका आयटी कंपनीत काम करत होता. तो मूळचा सोलापूरचा होता. मात्र, तो कामासाठी पुण्यात स्थायिक झाला होता. पण पुणे येथील हडपसरमध्ये 2 जून 2014 ला दंगल उसळली होती. या दंगलीत मोहसीनचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मोहसीनचा भाऊ मोबीन मोहंमद सादीक शेख याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईसह (Dhananjay Desai) 20 जणांना अटक केली होती. महापुरुषांबाबत वादग्रस्त पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे ही दंगल उसळली होती. हिंदू राष्ट्र सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मोहसीनला मारहाण केली होती. या मारहाणीत मोहसीनचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणामध्ये पुणे सत्र न्यायालयाने हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईसह 20 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
दरम्यान ही संपूर्ण मुलाखत पाहा आज रात्री 9.00 आणि रविवारी 20 जुलैला दुपारी 12.00 वाजता फक्त झी 24 तासवर..