Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Explained: तोडफोड, राडा, फडणवीसांची प्रतिक्रिया, गोंधळ अन्... कुणाल कामरा शिंदेंबद्दल नेमकं काय म्हणाला?

What Exactly Kunal Kamra Said About Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यभरामध्ये गोंधळ सुरु असतानाच कामरा नेमकं काय म्हणालाय हे अनेकांना ठाऊक नाही.

Explained: तोडफोड, राडा, फडणवीसांची प्रतिक्रिया, गोंधळ अन्... कुणाल कामरा शिंदेंबद्दल नेमकं काय म्हणाला?

What Exactly Kunal Kamra Said About Eknath Shinde: राज्याच्या राजकारणामध्ये सध्या स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन रान उठलं आहे. कामराने पोस्ट केलेल्या स्टॅण्डअप कॉमेडीच्या व्हिडीओवरुन रविवारी रात्री खारमध्ये असलेल्या कामराच्या सेटची तोडफोड केली. या प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही इशारा दिला आहे. हे प्रकरण विधानसभेमध्येही चर्चेत आलं. सत्ताधारी आमदारांनी एकत्र येत कुणाल कामराला अटक करुन त्याचा बोलवता धनी कोण हे शोधून काढण्याची मागणी केली. यावरुन विधानसभेचं कामकाज काही मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. राज्यभरामध्ये कुणाल कामराच्या या व्हिडीओवरुन झालेल्या वादाची आणि तोडफोडीची चर्चा आहे. मात्र या व्हिडीओत कामरा नेमकं काय म्हणाला आहे हे अनेकांना ठाऊक नाही. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात...

कुठे झाला हा शो?

कुणाल कामराने आपल्या युट्यूब अकाऊंटवरुन स्टॅण्डअप कॉमेडीच्या शोमधील व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा शो मुंबईतील खार येथील युनी कॉन्टिनेंटल हॉटेलमधील 'द हॅबिटॅट क्लब'मध्ये पार पडला होता. या शोमधील महाराष्ट्रातील राजकारणावर कुणाल कामराने सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्याची दोन मिनिटांची क्लिप पोस्ट केली असून त्यावरुनच वाद निर्माण झाला आहे. यामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या घडामोडींचा संदर्भ कामराने दिला आहे. 

कामरा नेमकं काय म्हणाला?

"महाराष्ट्राच्या निवडणुकीत यांनी काय केलं आहे पाहा. शिवसेना भाजपामधून बाहेर आली. मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून बाहेर आली. एका मतदाराला 9 बटणं दिली. सगळेच गोंधळून गेले. मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील एकाने सुरु केलं होतं," असं म्हणत कुणालने पुढे 'भोली सी सुरत, आँखो मे मस्ती' गाण्याच्या चालीवर एक गाणं सादर केलं. यामध्ये त्याने ठाण्यातील रिक्षा, चेहऱ्यावर दाढी, डोळ्यावर चष्मा असा उल्लेख गाण्यामधून केला आहे. तसेच पुढे बोलताना, "एक झलक दाखवून कधी गुवहाटीमध्ये लपले," असंही म्हटलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांबरोबर काही काळ गुवहाटीमध्ये वास्तव्यास असल्याचा संदर्भ यामधून देण्याचा प्रयत्न कामराने केला आहे. 

नक्की वाचा >> 'राहुल गांधींचं संविधान दाखवून तुम्ही...'; शिंदेंच्या अपमानावरुन फडणवीसांनी कुणाल कामराला सुनावलं

"पक्ष बदलणारी व्यक्ती"

याच गाण्याच्या चालीत कामराने, "माझ्या नजरेतून पाहिलं तर ती व्यक्ती गद्दार आहे," असंही म्हटलं आहे. "मंत्री नाही तर ती व्यक्ती पक्ष बदलणारी आहे, अजून काय सांगू?" असंही कामराने म्हटलंय. "ज्या थाळीत खाल्लं त्याच थाळीत त्यांनी छिद्र केलं," असंही कामराने या गाण्यात म्हटलं आहे. "राजकीय परिवारवाद संपवायचा होता म्हणून यांनी बाप चोरला असं यांचं राजकारण आहे," असं कामराने गाण्यात म्हटलं आहे. 

फडणवीसांकडून कायदेशीर कारवाईचा इशारा

दरम्यान, मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणामध्ये कुणाल कामराने माफी मागणी असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी, "दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारं स्वातंत्र्य योग्य नाही. या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई केली जाईल," असं म्हटलं आहे. 

Read More