आजवर आपण बनावट दूध, बनावट पनीर बाजारात मिळत असल्याचं ऐकलं असेल. मात्र आता बाजारात बनावट बासमती तांदूळही मिळू लागला आहे. या बासमतीचा सुगंध येण्यासाठी केमिकलचा वापर केला जात आहे. अहिल्यानगरात अशा एका गोदामावर धाड पडली. नेमकं काय झालं जाणून घ्या.
लांब दाणे, विशिष्ट सुगंध आणि चवदार म्हणून बासमती तांदूळ ओळखला जातो. अगदी बडे बडे स्टार या बासमती तांदळाची जाहिरात करताना आपण पाहिलं आहे. त्यामुळं सर्वसामान्यांनाही या बासमती तांदळाचं आकर्षण आहे. मात्र ग्राहकांच्या याच आकर्षणाला फायदा नफ्यासाठी काही व्यापारी उचलत आहेत. अहिल्यानगरात एमआयडीसीत खुशी इंडस्ट्रीज या कंपनीत अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी हा छापा टाकून 62 लाखांचा तांदूळ आणि काही रसायनं जप्त केली आहेत. हे केमिकल तांदळाला जास्त सुगंधी बनवण्यासाठी वापरली जात होती असा संशय अधिकाऱ्यांना आहे.
आता तांदळाला लावल्या जाणाऱ्या केमिकलची तपासणी केली जाणार आहे. मात्र तांदूळ अधिक सुगंधी बनवण्यासाठी वापरली जाणारी रसायनं अनेक गंभीर आजारांना अगदी कॅन्सरलाही निमंत्रण देऊ शकतात अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान या कारवाईनंतर कंपनीचे मालक राकेश मेहतानी यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. गोडाऊनवर अशी कुठलीही रासायनिक प्रक्रिया करून तांदूळ पॅक केले जात नाही, आपण बासमती तांदूळच खरेदी करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आजच्या युगात चांगलं दर्जेदार अन्न मिळावं यासाठी चार पैसे जास्त मोजायला लोक तयार असतात. मात्र चार पैसे जास्त कमावण्यासाठी काही लोक केमिकल, भेसळीचा आधार घेऊन अन्नात विष पेरतात. अन्न आणि औषध प्रशासनानं अशांविरोधात कडक धोरणं राबवायला हवं. आता अहिल्यानगरातील या तांदळात सुंगधी केमिकल मिसळून बासमतीचा सुंगध देण्याचा खरंच प्रयत्न झालाय का ते तपासाअंती समोर येईलच. मात्र आपणही सजग ग्राहक म्हणून घरात आणल्या जाणाऱ्या वस्तूंच्या शुद्धतेची शहानिशा करणं गरजेचं आहे.