लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर : शहरी भाग असो वा ग्रामीण भाग आर्थिक व्यवहारासाठी आपण लगेच खिशातून नोटा काढतो. अनेकदा घाईत असल्यानं कित्येक जण समोरच्यांनी दिलेल्या नोटा घेतात आणि पुढच्या कामाला निघतात. तर काहींना मात्र हातातली नोट खरी कि खोटी हेही समजत नाही. हे सांगण्याचं कारण तुम्ही मात्र आतापासून स्वत:कडच्या नोटा नीट तपासा.
चलनात पाचशेच्या बनावट नोटा?
तुमच्या खिशातली पाचशेची नोट तपासा
छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचा छापखाना
दुकानात किंवा कुठेही आर्थिक व्यवहार करत असाल आणि कुणी 500 ची नोट काढली तर सावधान. ती नीट तपासून घ्या. कारण 500ची ती नोट बनावट असू शकते. पोलिसांनी बनावट नोटाच्या छापखान्यावर धाड टाकली आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. दोन इसम पाचशे रूपयाच्या बनावट नोटा घेऊन काळ्या रंगाच्या थार गाडीमधून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांचाही माग काढला. त्या दोघांनी एका पानटपरीवर जाऊन सिगारेट घेतली आणि त्यावेळी बनावट नोट दिली. त्यानंतर पोलिसांनी 27 वर्षीय निखील आणि 25 वर्षीय सोमनाथ या दोघांना पकडलं आणि गाडीची झाडाझडती घेताच त्यांच्याकडे 80 हजार रूपयांच्या नोटा सापडल्या. पण यामागे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना होता त्यांनी सखोल तपास करत बीडमधून एकाच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरातून पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
2021 साली छत्रपती संभाजीनगरात एका घरात आरोपींनी बनावट नोटांचा छापखाना सुरू केला होता. या कारवाईत आरोपींकडून 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्यात. आरोपींकडचं बनावट नोटांसह कागद, प्रिंटर तसंच इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केलंय.. या टोळींनी आणखी कोणकोणत्या शहरांमध्ये बनावट नोटा पोहोचवल्यात याचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्हेगार कितीही हुशार असले तरी शेवटी त्यांचे काळे कारनामे पोलीस शोधून काढतातच.