भंडारा जिल्ह्यात खोटं दिव्यांग प्रमाणपत्राचं प्रकरण समोर आलंय. खोटं प्रमाणपत्राद्वारे काहींनी सरकारी नोकरी मिळवली तर काहींनी नोकरीत पदोन्नती, बदलीत सूट मिळावी म्हणून खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात समोर आलाय. भंडारा जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा घोटाळा समोर आलाय. खोटी दिव्यांग प्रमाणपत्रं सादर करून अनेकांनी नोकरी मिळवली. काहींनी पदोन्नती मिळवली तर काहींनी नोकरीच्या बदलीतून सूट मिळवली. हे सुरू असताना जे खरोखर दिव्यांग आहेत त्यांच्यावर मात्र अन्याय झाला. अशा तक्रारी येताच अधिका-यांची झोप उडाली.
- भंडारा जिल्ह्यात वर्ग 3 आणि वर्ग 4 साठी दिव्यांगाच्या राखीव जागेसाठी खोटी दिव्यांग प्रमाणपत्र सादर
- नोकरी मिळवण्यासह पदोन्नती, नोकरीच्या बदलीत सूट मिळावी म्हणूनही खोटी दिव्यांग प्रमाणपत्र सादर
- सामाजिक कार्यकर्ते विजय क्षीरसागर यांचा काही अधिका-यांवर संशय
- जिल्हाधिकारी कार्यालयातून दिव्यांग कोट्यातून लागलेल्यांची यादी मागवली
- संशय बळावल्यानं दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवलेल्यांच्या प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीची मागणी
- उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रेंनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून तपासणी करण्याचं पत्र काढलं
- मात्र पत्राला अधिका-यांकडून केराची टोपली
- पुन्हा दिव्यांग कर्मचा-यांची वैद्यकीय तपासणी करून UDID अद्ययावत करण्याची मागणी
सामान्य प्रवर्गातल्या दिव्यांगांवर अन्याय होत असताना प्रशासन मात्र बोगस अधिकारी आणि कर्मचा-यांना पाठिशी घालतंय, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय क्षीरसागर यांनी केलाय. ज्यांच्या तक्रारी आहेत, त्यांना आम्ही तपासतो आणि UDID देतो, असं जिल्हा शल्य चिकित्सक दीपचंद सोयाम यांनी सांगितलं. याआधी तक्रार होऊनही दखल न घेतल्यानं खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिलेल्याचं फावलं. त्यांच्यावर पुन्हा एकदा कारवाईची मागणी होतेय. आता तरी दोषींवर गुन्हा दाखल होईल का, असा प्रश्न विचारला जातोय.