Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात फॅमिली ड्रामा पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे बंधू एकत्र आलेत. तब्बल 20 वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मात्र त्यापाठोपाठ आता रायगडमध्ये तटकरे कुटुंबही एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. सुनील तटकरेंच्या वाढदिवसा निमित्तानं तटकरे कुटुंबीयांचं मनोमिलन झालंय.
आधी पवार, नंतर ठाकरे आणि आता तटकरे कुटुंब एकत्र आले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निर्माण झालेला दुरावा संपवून पवार कुटुंब अनेकदा एकत्र आलं. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत आणि आता सर्व मतभेद सारून रायगडमध्ये तटकरे कुटुंबही एकत्र आले.
राजकारणात गेल्या 12 वर्षांपासून तटकरे कुटुंबीयांत निर्माण झालेला दुरावा अखेर दूर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त तटकरे कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. एकेकाळी एकत्र असणारं तटकरे कुटूंब राजकीय मतभेदांमुळे एकमेकांचे राजकीय वैरी बनले होते.
माजी आमदार आणि सुनील तटकरेंचे मोठे बंधू अनिल तटकरे यांनी वेगळी चूल मांडली तर माजी आमदार आणि पुतणे अवधूत तटकरे यांनी शिवसेना व नंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानं ही दरी अधिकच वाढली होती. बारा वर्षांत दोन्ही कुटुंबाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. मात्र, सुनील तटकरे यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्तानं हे सर्व कुटुंबीय एकत्र आलेत. त्यामुळे तटकरे कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं...मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी देखील कुटुंबीयांचं स्वागत केलं आणि मग रंगली ती आनंदाची मैफिल.
महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेचे दाखल देशभर दिले जातात. राजकीय मतभेद असले तरी कुटुंब एकत्र ठेवणं ही राज्याची राजकीय संस्कृती आहे. गेल्या काही दिवसांपासून याच राजकीय संस्कृतीचं दर्शन होताना दिसतंय.त्यामुळेच राजकीय मतभेद असतानाही पवार, ठाकरे आणि आता तटकरे कुटुंब एकत्र येताना पाहायला मिळत आहे.