मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका म्हणजे लोकशाहीचे मॅच फिक्सिंग होतं असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांवर आक्षेप घेत राहुल गांधींनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकावर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील निवडक मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला. ही निवडणूक म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी घडवलेला खेळ होता असा आरोपही राहुल गांधींनी केला. महाराष्ट्रात जी ‘मॅच फिक्सिंग’ झाली ती आता बिहार, इतर राज्यांमध्ये होणार अशी भीतीही राहुल गांधींनी या लेखातून व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीतल्या महाराष्ट्राच्या निकालावर राहुल गांधींनी घेतलेली शंका कायम आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहलेल्या लेखात त्यांनी महाराष्ट्रातल्या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले.
निवडणूक आयुक्तांची निवड करणारी समितीच हेरफेर करून फिक्स केली. मतदार यादीत बनावट नावांची मोठ्या प्रमाणावर भर पडली, 5 महिन्यांत तब्बल 41 लाख नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर असलेल्या विधानसभा मतदारसंघात चमत्कारिक वाढ झाली. मतदानानंतर 76 लाख मतांची चमत्कारिक वाढ झाली. पुरावे लपवण्यासाठी नियमात बदल. CCTV फुटेज मागितल्यावर निवडणूक आयोगाकडून अडथळे निर्माण केल्याचा आरोप राहुल गांधींनी आपल्या लेखात केला.
राहुल गांधींच्या आरोपांवर महायुती सरकार तुटून पडलंय. राहुल गांधींचं वक्तव्य हे नापास झालेल्या मुलासारखं असल्याचा टोला भाजपनं लगावलाय. राहुल गांधी आरोप करुन सामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राहुल गांधींच्या दाव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरपूस भाषेत समाचार घेतलाय. राहुल गांधींचा दावा म्हणजे मतदारांचा अपमान असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केलाय. निवडणूक आयोगानं या विषयावर स्पष्टीकरण दिल्यानंतरही विरोधकांचं समाधान झालेलं नाही. पुढच्या काळात राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानाचा मुद्दा उपस्थित करतील हे स्पष्ट झालं आहे.