Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

...तर दारुचे दुकान बंद होणार, नव्या नियमानुसार पिंपरी-चिंचवडमधील चार दुकान सील

महेश लांडगे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आवाज उठवल्यानंतर पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

...तर दारुचे दुकान बंद होणार, नव्या नियमानुसार पिंपरी-चिंचवडमधील चार दुकान सील

Pimpri-Chinchwad : जर तुम्ही देखील एखाद्या वसाहतीत राहत असाल आणि त्या वसाहतीत दारूचे दुकान असेल तर त्याचा होणारा त्रास खास करून तिथे असणाऱ्या महिलांना होत असतो पण तो त्रास शब्दात सांगता येत नाही. या दारुच्या दुकानामुळे वसाहतीत राहणाऱ्या महिला, लहान मुलांच्या सुरक्षिततेचा देखील अनेकदा प्रश्न निर्माण होतात. पण आता या त्रासातून मुक्त होणे शक्य झाले आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील वसाहतीमध्ये आणि लोकवस्तीमध्ये असलेल्या दारूच्या दुकानांवर आता कारवाई करण्यात आली आहे. 

लोकवस्तीमधील चार दारुच्या दुकानांवर कारवाई

पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या चिखली आणि मोशी या परिसरातील नागरिकांनी उत्साह आणि जल्लोष सुरू केला आहे. या नागरिकांच्या वसाहतीमध्ये दारूची दुकाने असल्यामुळे या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. वसाहतीमध्ये दारूचे दुकान असल्यामुळे नागरिक दुकानासमोरच दारू पिऊन हुल्लडबाजी करत होते. बऱ्याचदा यामुळे वादाचे प्रसंग ही निर्माण होत होते. तरुणी आणि महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत होता. मात्र, आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लोकवस्तीमध्ये असलेल्या चार दुकानांवर कारवाई करत दारूची दुकाने आता सील करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

50% नागरिकांचा आक्षेप असेल तर दारुचे दुकान बंद होणार

नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनादरम्यान भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी वसाहतीमध्ये सुरु असलेल्या दारूच्या दुकानासंदर्भात प्रश्न उपस्थित करत त्यासंबंधीची नियमावली बदलण्याची मागणी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वसाहतीमधील 50% नागरिकांचा आक्षेप असेल तर त्या ठिकाणी दारूचे दुकान बंद केले जाईल असे स्पष्ट केले होते. त्याच बदललेल्या नियमावलींचा आधार घेत उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांच्या मागणीनुसार चार दुकानांवर कारवाई करत ती सील केली आहेत. दारूच्या दुकानात संदर्भातील हा नियम फक्त पिंपरी चिंचवड नाही तर राज्यभरासाठी लागू आहे. त्यामुळे नागरिकांना दारूच्या दुकानाचा त्रास होत असेल तर त्यांनी विरोध नोंदवत ती बंद करावीत असं आवाहन महेश लांडगे यांनी केलं आहे. 

वसाहतीमध्ये दारूचे दुकान असणं ही वरकारणी शिल्लक बाब वाटत असली तरी त्याचा त्या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत असतो. त्यामुळे असा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही ही ते बंद करू शकता. 

Read More