Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बीडमध्ये फसवणुकीचा नवीन फंडा, लग्न जुळवून देतो म्हणत चार महिलांची 1.5 लाखांची फसवणूक

Beed Crime: बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. लग्न जुळवून देतो म्हणत चार महिलांची 1.5 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

बीडमध्ये फसवणुकीचा नवीन फंडा, लग्न जुळवून देतो म्हणत चार महिलांची 1.5 लाखांची फसवणूक

Beed Crime News: गंभीर आर्थिक अडचणीतून जात असलेल्या बीड जिल्ह्यातील चार मजूर महिलांना मुलांच्या लग्नाची आशा दाखवून तब्बल 1.5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील एक दाम्पत्य लग्न जुळवून देतो असे सांगून महिलांच्या घरी मुक्कामी राहिले आणि त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत फसवणूक करून फरार झाले.

ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात घडली असून पीडित महिलांनी हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. यामध्ये महिलांनी सांगितले की, जून महिन्यात धाराशिवचे एक दाम्पत्य त्यांच्याकडे आले. त्यांनी सांगितले की, आम्ही आतापर्यंत 25 लग्न जुळवून दिली आहेत. तुमच्याही मुलांसाठी योग्य मुली आमच्याकडे आहेत. त्या दृष्टीने त्यांनी एका महिलेच्या घरी महिनाभर मुक्काम केला.

चार महिलांची केली फसवणूक

दोन मुलांचे लग्न जुळवतो असे सांगून त्यांनी एकाच महिलेपासून एक लाख रुपये घेतले. त्यानंतर इतर तिघींनाही अशाच प्रकारे फसवून प्रत्येकी 50 हजार रुपये घेतले.  या महिलांनी सोनं गहाण ठेवून, कर्ज घेऊन पैसे दिले. या पैशांची उभारणी करण्यासाठी पीडित महिलांनी आपली सर्व साठवलेली संपत्ती पणाला लावली. ज्यामध्ये एका महिलेने गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवले. दुसऱ्या महिलेने बचत गटातून कर्ज घेतले. तर इतर महिलांनी मजुरी करून पैसे जमवले होते ते दिले.

मुलांच्या लग्नाच्या आशेच्या भरवशावर या महिलांनी त्या दाम्पत्याला नवीन कपडे, साड्या-चोळ्या आणि दक्षिणा देखील दिला. 25 जुलैपासून फरार हे दाम्पत्य अचानक संपर्कातून गायब झाले. त्यांचा दिलेला धाराशिवमधील पत्ता चुकीचा असल्याचेही समोर आले आहे. मोबाइल नंबरही बंद असल्यामुळे महिलांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

महिलांना अश्रू अनावर

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या चारही महिलांनी बुधवारी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. त्यांनी आपली व्यथा मांडत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आपले सोनं, कर्ज आणि मान-सन्मान गमावल्याने या महिलांना अश्रू अनावर झाले. 

लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटनांमध्ये बीड जिल्ह्यात सातत्याने वाढ होत आहे. अशा प्रकारच्या बनावट ‘जोडीदार सेवा’ देणाऱ्यांविरुद्ध पोलिस प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटलं आहे. 

About the Author

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारक... Read more

Read More