Freak Road Accident: नांदेडमध्ये एका विचित्र अपघातात 6 ते 7 मजुरांनी प्राण गमावल्याची माहिती समोर येत आहे. एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने झालेल्या विचित्र अपघातामध्ये मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आलेगाव शिवारामध्ये ही दुर्घटना घडली. कामासाठी मजुरांना घेऊन जात असतानाच ट्रॅक्टर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर विहिरीत जाऊन कोसळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आलेगावात राहणाऱ्या दगडोजी शिंदेंच्या शेतात कामासाठी हे सारे मजूर जात होते. सर्व मजूर हे हिंगोली जिल्ह्यातील वसमतमधील गुंज गावात राहणारे होते.
ज्या विहिरीमध्ये हा ट्रॅक्टर पडला त्यात बऱ्यापैकी पाणी असल्याने ट्रॅक्टर विहिरीमध्ये पूर्णपणे बुडाला आहे. या ट्रॅक्टरचं केवळ एक चाक वरुन दिसत आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे ट्रॅक्टरमध्ये 10 जण होते. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं असून 6 ते 7 मजुरांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी सध्या प्रशासनाकडून मदतकार्य राबवलं जात आहे.
नक्की वाचा >> सातव्या महिन्यातच रक्तस्राव, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय म्हणालं, '20 लाख दिले तरच...'; पुण्यात गर्भवती मातेचा दुर्देवी अंत
मदत पोहोचण्याआधी गावकऱ्यांनाही या ट्रॅक्टर अपघातातून बचावलेल्यांना मदत करण्यासाठी विहिरीमध्ये दोरखंड सोडले होते. या अपघाताची बातमी गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे.