Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मॉर्निग वॉकसाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या 6 मुलांवर काळाचा घात! भरधाव ट्रकने चिरडले, चार जणांचा मृत्यू, तर…

Gadchiroli Accident : 6 अल्पवयीन मुलं मॉर्निग वॉकसाठी गेले असताना भरधाव ट्रकने त्यांना चिरडलेय. दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना उपचारासाठी हॉस्पिटलला घेऊन जात असताना अखेरचा श्वास घेतला. 

मॉर्निग वॉकसाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या 6 मुलांवर काळाचा घात! भरधाव ट्रकने चिरडले, चार जणांचा मृत्यू, तर…

Gadchiroli Accident : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावात आज पहाटे एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. पहाटे 5 ते 6:30 च्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे गावात शोककळा पसरली आहे. आर्मोरी - गडचिरोली महामार्गावर 6 मुलांवर काळाचा घात झाला. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 6 मुलांवर भरधाव ट्रकने धडक दिली ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही चारही मुलं अल्पवयीन होती.  तर दोन जखमी मुलांना नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (gadchiroli nagpur highway accident six children were crushed by truck four of them die)

गडचिरोली अपघातात नेमकं काय घडलं?

काटली गावात, गडचिरोलीपासून 12 किमी अंतरावर, 12 ते 16 वयोगटातील सहा मुलं पहाटे व्यायामासाठी काटली नाल्याजवळ गेली असता क्षणात होत्याच नव्हतं झालं. वॉक झाल्यानंतर ही मुलं रस्त्याच्या कडेला बसली असताना धानीमनी नसताना अचानक एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, चालक ट्रक वेगात चालवत होते. तसंच तो अपघातानंतर तिथून पळून गेला. 

गडचिरोली अपघातातील मुलांची नावं काय?

अपघातात टिंकू नामदेव भोयर (14), तन्मय बालाजी मानकर (16), दुषण दुर्योधन मेश्राम (14), तुषार राजेंद्र मारभते (14) यांचा मृत्यू झाला आहे. ही मुलं काटली गावातील होती. तर जखमी झालेले क्षितिज तुलनिदास मेश्राम आणि आदित्य धनंजय कोहपटे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना नागपूरला पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप पसरला असून, काटली, साखरा आणि पोरला गावातील लोकांनी रस्ता अडवून निदर्शनं केली आहेत. या घटनेनंतर गडचिरोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती घेतली. ट्रकचालकाचा शोध सुरू आहे, परंतु अद्याप पोलिसांना यात यश आलेले नाही.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी X वर पोस्ट करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि म्हणाले, “आर्मोरी-गडचिरोली महामार्गावरील हा अपघात अत्यंत दुखद आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये सानुग्रह अनुदान दिलं जाईल आणि जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलेल.” जखमींना नागपूरला हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलं लष्करात भरती होण्याचं स्वप्न बघत होती आणि त्यासाठी नियमित व्यायाम करत होती. या अपघातामुळे त्यांच्या कुटूंबियांच्या स्वप्नांचा चुराड झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र दुःख पसरलं आहे.

 

Read More