Ganeshotsav News : गणेशोत्सव... सर्वदूर साजरा होणाऱ्या या उत्सवाचा या सणाचा उच्चार जरी केला, तरीही कमालीची सकारात्मकता त्या उच्चारातूनच जाणवते. अशा या उत्सवाचं खरं रुप (Ganeshotsav in mumbai) मुंबई, पुणे (Ganeshotsav in pune) यांसारख्या शहरांमध्ये अधिक उत्साही वातावरणात आणि नवनवीन शैलीत दिसून येतं. ज्याप्रमाणं पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की मानाच्या गणपतींची चर्चा होते. अगदी त्याचप्रमाणे मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं की लगेचच डोळ्यांपुढे उभं राहतं ते म्हणजे (lalbaug parel ganeshotsav) लालबाग- परळ आणि गिरगाव.
गणेशोत्सव सुरू होण्याच्या काही महिने आधीपासून खऱ्या अर्थानं गिरणगाव अशी ओळख असणाऱ्या या लालबाग- परळमध्ये गणपतींच्या मूर्ती साकारण्यासाठीच्या चित्रशाळा उभ्या राहतात, मोठे मंडप उभे राहतात आणि त्यात मान वरव करून पाहावं लागेल इतक्या भव्य मूर्ती कलाकार- मूर्तीकार साकारत असतात. अशा या मूर्ती यंदाच्या वर्षीच्या सोहळ्यासाठी मंडपांच्या दिशेनं मार्गस्थ होण्यास सुरुवात झाली आहे.
नुकतंच मुंबईच्या याच परिसरातील लोकप्रिय अशा काळाचौकीचा महागणपती (Kalachowkicha Mahaganpati) या गणेशमंडळाकडून गणपतीची भव्य मूर्ती मंडपात नेण्यात आली. अतिशय दिमाखदार अशा आगमन मिरवणुकीतून मार्गस्थ झालेली ही मूर्ती पाहण्यासाठी अनेकांनीच तोबा गर्दी केली. याच गर्दीचं लक्ष वेधलं ते ढोलताशाच्या गजरानं. ढोलाचा पहिला ठोका पडला आणि ताशाची तर्री वाजताच वादकांवर कॅमेरांच्या नजरा खिळल्या. कारण, इथं दिसणारं दृश्य काहीसं अनपेक्षित पण तितकंच अभिमान वाटेल इतकं कमाल होतं.
मुंबईतील (Moraya Dhol Tasha Pathak Mumbai) मोरया ढोल ताशा आणि ध्वज पथकानं दरवर्षीच गणेशोत्सवातील वादनांच्या वेळी नव्या संकल्पना सादर केल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी त्यांच्या सादरीकरणाचा विषय होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण. महाराष्ट्रात मराठीचाच आवाज घुमणार आणि तोसुद्धा सामाजिक ऐक्य जपत, जात,धर्म, पंथ यांच्यातील वादाला पायदळी तुडवत.... असा कमाल संदेश पथकानं यावेळी दिला आणि पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहता ही पथकाला मिळणारी शाबासकीचीच दाद होती.
वादकांनी विविध धर्म, पंथ, रोजगाराशी संबंधित वेश करत एकजुटीनं ढोलताशा वादन सादर केलं आणि प्रत्येकाच्याच ढोलावर मायमराठीचं महत्त्वं आणि एकजुटीनं राहण्यासाठीच्या दृष्टीकोनावर आधारित संदेश लिहिण्यात आला होता. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या पथकानं आणि पथकातील वादकांसह ध्वजधाऱ्यांनी आपली कला सादर करत सामाजिक संदेश देण्यासाठी या कलेचाच सुरेख वापर केल्याचं पाहायला मिळालं.
लालबागच्या रस्त्यांवर, जिथं कधीकाळी या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचेही पडसाद उमटले त्याच लालबाग- परळच्या रस्त्यांवर सामाजिक ऐक्याचा आणि महाराष्ट्रात मराठीच! असा आग्रही सूर आळवणारा संदेश देणारं हे पथक सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तुम्हाला कसं वाटलं हे सादरीकरण?