Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

NCP च्या बैठकीत गौतमी पाटीलच्या लावणीचा उल्लेख, अजित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले "हे अजिबात..."

Gautami Patil NCP Ajit Pawar: मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या (Lavni Dancer Gautami Patil) अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची अजित पवार (NCP Ajit Pawar) यांच्याकडे करण्यात आली आहे. यानंतर अजित पवार यांनी लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.   

NCP च्या बैठकीत गौतमी पाटीलच्या लावणीचा उल्लेख, अजित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले

Gautami Patil NCP Ajit Pawar: नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) चांगलंच चर्चेत आहे. आपल्या डान्स स्टाईलमुळे प्रसिद्ध असणारी गौतमी पाटील लावणीच्या (Gautami Patil Lavni) नावाखाली अश्लील डान्स करत असल्याची टीका होत असते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमुळे एकीकडे वाद सुरु असताना दुसरीकडे तिला याचा फायदा मिळत असून अनेक सुपाऱ्या मिळताना दिसत आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) पदाधिकारीही सहभागी असतात. नेमका हाच मुद्दा विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर मांडण्यात आला असता त्यांनी नाराजी जाहीर केली. 

राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांसह झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे (Megha Ghadge) यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला. मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी अजित पवारांकडे केली. 

यानंतर अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार, लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालण्यात येणार आहे. राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या आहेत. 

राज्यात लावणींच्या नावाखाली अश्लील डान्सचे प्रकार वाढू लागल्याने आणि गावोगावी त्यांचं आयोजन केलं जात असल्यामुळे राष्ट्रवादीने ही भूमिका घेतली आहे. अजित पवारांनी यावेळी लवकरच पक्षाकडून पत्रक काढून राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना कळवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच लावणी कार्यक्रमासाठी सेन्सॉर लवकरात सुरू करण्याबाबत देखील प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. 

"राष्ट्रवादी पक्षाला अजिबात मान्य नाही"

"महाराष्ट्राच्या संस्कृतीला यामुळे कमीपणा आणला जात आहे. महाराष्ट्राची काही परंपरा आहेत. ते सर्वांना पाहता येतील अशाप्रकारचे असले पाहिजेत. त्यात अश्लील प्रकार असता कामा नये. मला काल जी माहिती मिळाली त्यानुसार, काही जिल्ह्यात बंदी आहे पण काही ठिकाणी सुरु आहे. मी यासंबंधी संबंधितांशी बोलणार आहे. शक्य झाल्यास अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहे. महाराष्ट्राची परंपरा टिकली पाहिजे. कोणी चुकत असेल तर त्यांना अडवलं पाहिजे," असं अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. राष्ट्रवादी पक्षाला हे अजिबात मान्य नसून तशा सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले. 

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिलांनी हाती घेतल्या काठ्या

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी गावात काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी तुफान गर्दी झाली होती. यावेळी तरुणांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तरुणांनी हुल्लडबाजी सुरु केल्याने काही वेळासाठी कार्यक्रम थांबवावा लागला. कार्यक्रम नीट पार पडावा यासाठी गावातील महिलांवर हातात काठ्या घेऊन उभे राहण्याची वेळ आली. काही वेळाने परिस्थिती शांत झाल्यानंतर गौतमी पाटीलने पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात केली.

Read More