Chhatrapati Sambhaji Nagar Rehabilitation Centre Shocking Details: लहान वयात गुन्हेगारीच्या वाटेवर भरकटलेल्यांना आयुष्यात पुन्हा एक संधी देण्याचं ठिकाण म्हणजे बालसुधारगृह! गंभीर आरोपांअंतर्गत अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुला-मुलींना बालसुधारगृहांमध्ये ठेवलं जातं. इथे त्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीतून बाहेर येण्यास मदत करणं अपेक्षित असतं. मात्र या बालसुधारगृहातील खरी परिस्थिती वेगळीच असल्याचं नुकतं एका प्रकरणामधून समोर आलं आहे. हा सारा प्रकार घडला आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहामध्ये!
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहामधून गेल्या आठवड्यात नऊ मुलींनी पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी मुलींना पकडून पुन्हा बालसुधारगृहाच्या ताब्यात दिले. यापैकी काही मुलींनी पालकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पुढे या प्रकरणात चौकशी सुरू झाली आहे. मात्र, या मुली बालसुधारगृहातून नेमक्या का पळाल्या? नेमकं काय घडले? हे शोधण्याचा प्रयत्न केल्यावर धक्कादायक माहिती पुढं आली आहे. या मुलींनी पळ काढल्यानंतर हर्षु ठाकूर या सामाजिक कार्यकत्या भेटल्या. पुढं चौकशी दरम्यानही ठाकूर उपस्थित होत्या. त्यांनी मुलीच्या तोंडून ऐकलेली धक्कादायक माहिती 'झी 24 तास'ला दिली आहे.
बालगृहातील मुलींचे कुठल्याही कारणाने पोट दुखले तरी त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती असा आरोप मुलींनी केला आहे. मुली आजारी पडल्यावर त्यावर उपचार म्हणून एकाच प्रकारची कुठली तरी गोळी दिली जात होती. त्यामुळे मुली अनेक दिवस एकाच आजाराने ग्रासलेल्या राहायच्या. या गोळीनेदेखील मुली बऱ्या झाल्या नाही तर पवित्र पाणी शिंपडून अथवा शरीरावर क्रॉस चिन्ह काढून त्यांना आता तुम्ही बऱ्या व्हाल असा सांगितलं जायचं, असा आरोप ठाकूर यांनी केलाय आहे.
या मुलींना मारहाण व्हायची. त्यांच्या झोपण्याच्या रूममध्ये कॅमेरे लावलेले होते. कपडे बदलताना सुद्धा कॅमेरा समोर त्यांना उभं राहावे लागत असल्याचे मुलींनी सांगितलं असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे. बालगृहामधून या मुलींना मोबाईलवरुन काही मुलांना कॉलसुद्धा करायला लावायचे, असेही त्यांनी सांगितले. मुलींची जवळीक वाढली तर त्यांना 'लेस्बियन आहे' म्हणत चिडवण्यात येते असा ही आरोप ठाकूर यांनी केलाय.
मुलींचा बालकल्याण समितीपुढे जेव्हा जबाब घेण्यात आला त्यावेळी आपण तिथे उपस्थितीत होतो आणि आपल्या समोरच मुलींनी आपली आपबीती सांगितली असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे.