Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

125 विद्यार्थिनींना कपडे काढण्यास सांगणारी 'ती' शाळा कायमची बंद? मासिक पाळी प्रकरणाला नवं वळण?

Girls Stripped Thane School: या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. सदर प्रकरणाची विधानसभेमध्येही चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आणि कठोर कारवाईचं आश्वासन देण्यात आलं.

125 विद्यार्थिनींना कपडे काढण्यास सांगणारी 'ती' शाळा कायमची बंद? मासिक पाळी प्रकरणाला नवं वळण?

Girls Stripped Thane School: मासिक पाळी संदर्भात वादग्रस्त ठरलेल्या ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यामधील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संस्था चालकांनी घेतला होता. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने आजपासून शाळा सुरळीत सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र या प्रकरणासंदर्भात खुलासा आणि शाळा चालविण्यासाठी आवश्यक नियम व निकष येत्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

नेमकं शाळेत घडलं काय?

शहापूरमधील येथील नामांकित शाळेच्या स्वच्छतागृहात रक्त सांडल्याचे आढळून आल्यानंतर सुमारे सव्वाशे विद्यार्थिनींची गणवेश उतरवून तपासणी करण्यात आल्याचा निंदनीय प्रकार घडला होता. हा प्रकार 8 जुलैला घडला होता. यामुळे संतप्त पालकांनी दुसऱ्या दिवशी शाळेवर धडक देऊन मुख्याध्यापकांना घेराव घालत जाब विचारला. तसेच मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली होती. त्यानंतर मुख्याध्यापकांसह महिला कर्मचारी, चार शिक्षिका आणि दोन संस्था चालकांविरुद्ध पोक्सो अंतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शाळेनं काय आश्वासन दिलं

अखेर पाच दिवस बंद असलेली ही शाळा आजपासून सुरू करण्यात आली आहे. सॅनिटरी पॅड उपलब्ध व नष्ट करण्याच्या यंत्रासह विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांची पूर्तता एक महिन्यात करून देण्याचे आश्वासन संस्थेच्या समन्वयकांनी दिले. विद्यार्थ्यांचे महिला बाल विकास विभागाच्या माध्यमातून समुपदेशन करण्यासही शाळेनं होकार दिला आहे.

विशेष बैठक पार पडली

पालक आणि शिक्षक यांची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीस प्राथमिक शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे, माध्यमिक शिक्षण अधिकारी देवीदास महाजन, गट शिक्षणाधिकारी रामचंद्र विशे, पोलिस उपाधीक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, आमदार दौलत दरोडा, संस्थेचे समन्वयक जे. डी. भतांगे शिक्षक उपस्थित होते.

बैठकीत काय ठरलं?

बैठकीत शाळेची मान्यता रद्द करू नये अशी मागणी अनिल निचिते यांनी केली. तसेच शाळेच्या इमारतीचे व्यवस्थापन, शिक्षक भरती, कार्यकारी मंडळ, शिक्षक-पालक संघ, सखी सावित्री समिती, विशाखा समिती, परिवहन समिती, महिला तक्रार समिती, तक्रारपेटी या उणिवांकडे लक्ष वेधले. शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, 2 शाळा चालविण्यासाठी आवश्यक असलेले नियम व निकष पंधरा दिवसांत पूर्ण करावेत. तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागांसाठी स्वतंत्र मुख्याध्यापकांची नियुक्त्ती करावी, असेही निर्देश देण्यात आले. कथित प्रकार घडल्यानंतर 2 शिक्षण विभाग शाळेची मान्यता रद्द करण्याच्या प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहत आहे. मात्र, सुधारणा करण्याची संधी देत शाळेला मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read More