ST employees DA: महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत घोषणा करण्यात आली. सद्यस्थितीत राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांना मुळवेतनावर 46 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. पण आता यात वाढ होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केलीय.
राज्य परिवहन कर्मचारी आणि अधिकारी यांना जुन- जुलै 2025 च्या वेतनापासून मुळवेतनावर 53 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 7 टक्के वाढ झालीय. महागाई भत्ता वाढीमुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे 19 कोटींचा आर्थिक भार वाढणार आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून यथावकाश निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश संबंधित देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.एसटीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्य बळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एसटीला गरज भासणार असून त्या अनुषंगाने भारती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया प्रताप सरनाईक म्हणाले.
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा -नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध आणि महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भभवत आहेत. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी. जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी व नव्या थांब्यांना मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एसटी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर लागू आहे. महागाई भत्याची 2018 पासूनची थकबाकी प्रलंबित आहे. न्यायालयाने थकबाकी देण्याबाबतचा निर्णय दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे आता महागाई भत्ता 53 टक्के लागू केला आहे. त्यामुळे महागाई भत्ता थकबाकी ही फेब्रुवारी 2025 मधील देय वेतनात देण्यात आले आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप 43 टक्के महागाई भत्ता देण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 53 टक्के महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना देखील देण्यात यावा. यासोबतच एप्रिल 2016 ते 2021 पर्यंतचे घरभाडे आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी प्रलंबित आहे ते देखील देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, जाचक शिस्त आणि आवेदन कार्यपद्धती रद्द करा. तसेच एसटी चालकांचा दोष नसताना देखील आरटीओ विभागाकडून करण्यात आलेली दंडात्मक कारवाई देखील रद्द करण्याची मागणी ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.