वैभव बालकुंदे (प्रतिनिधी) लातूर : आपण अनेकदा एखाद्या शासकीय योजनेत घोटाळा झाल्याचं ऐकलंय. मात्र, अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावे कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं पहिल्यांदाच समोर आलंय. आणि हे सुद्धा महाराष्ट्रात. लातूरच्या उदगीर तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या नावे शासकीय योजनेतील सवलतीतून अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्रात अस्तित्वातच नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावे कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय. लातूरच्या उदगीर तालुक्यातील वंजारवाडी गावात ग्रामपंचायत असल्याचं कागदावर दाखवण्यात आलंय. ग्रामपंचायतीच्या नावे बनावट शिक्के, तसंच अधिका-यांच्या खोट्या सह्या आणि लेटरपॅड वापरून शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेत घोटाळा करण्यात आला आहे. याच बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय योजनेतून शिष्यवृत्ती, साहित्य अनुदान आणि शैक्षणिक सवलती मिळवल्याचं समोर आलं आहे. एकाच गावात जवळपास 90 पेक्षा जास्त प्रमाणपत्र बनावट असल्याचं चौकशीतून स्पष्ट झालं आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे 90 बोगस कामगारांची नोंद झालीये. या सर्वांच्या नावे शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेतून शिष्यवृत्तीसह अनुदान लाटण्यात आल्यानं उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात एजंट, बांधकाम ठेकेदार आणि मल्टिसर्व्हिस चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
उदगीर तालुक्यातील वंजारवाडी हे गाव तोंडात या गटग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. मात्र, वंजारवाडी ही ग्रामपंचायत असल्याचं कागदोपत्री दाखवून शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आलाय.