Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गुणरत्न सदावर्तेंची राज ठाकरेंविरोधात तक्रार, मनसे काय भूमिका घेणार?

Gunaratna Sadavarte On MNS: मनसेनं पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घेतलाय.

गुणरत्न सदावर्तेंची राज ठाकरेंविरोधात तक्रार, मनसे काय भूमिका घेणार?

Gunaratna Sadavarte On MNS: मनसेनं पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घेतलाय. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांनी बँकांमधील व्यवहार मराठीत होतायत का हे तपासायला सुरवात केलीय. काही ठिकाणी मराठीला विरोध करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना मनसेनं हिसकाही दाखवलाय. मात्र मनसेच्या या आंदोलनाचा राज्यातील बँक कर्मचाऱ्यांनी धसका घेतलाय. यामुळे बँकांमधल्या कर्मचा-यांची घाबरगुंडी उडायलीय. बँक कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच सुरक्षेची मागणी केलीय. 

मनसेनं मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरलाय. राज्यभरात मनसे पदाधिकाऱ्यांनी बँकांमध्ये भेटी देत मराठीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. काही मुजोर बँक कर्मचाऱ्यांना मनसे स्टाईल हिसकाही दाखवला. मात्र मनसेच्या आंदोलनाचा बँक कर्मचा-यांनी धसका घेतलाय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहीत साकडं घातलंय. मारहाण केली जातेय, असा आरोप करत सुरक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बँकांमध्ये मराठी वापरली जातेय का हे तपासा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर राज्यभरातील मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी तर बँकांमधील हिंदितील बॅनर मनसेनं उतरवले. तर मुजोरी करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना मनसे स्टाईल धडाही शिकववला. नुकतीच नवी मुंबईत मनसेच्या शिष्टमंडळानं जुईनगर स्टेट बँकेत धडक दिलीय. तिथे आर्थिक व्यवहारांच्या पावत्या हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध होत्या. याबाबत मनसेनं अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसंच बँक अधिकाऱ्यांना बालभारतीचं पुस्तक भेट दिलं आणि आठवड्याभरात पावत्या मराठीत द्या, असा इशारा दिलाय. तर मनसेविरोधात गुणरत्न सदावर्ते आक्रमक झालेत. सदावर्ते मुंबई पोलिस आयुक्तांना भेटत राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केलीय.

मनसेच्या स्थापनेपासून अनेक वर्ष मनसेने मराठीचा मुद्दा आक्रमकपणे मांडलाय.मराठीचा मुद्दा, टोलविरोधातील आंदोलन त्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा आणि आता पुन्हा मराठीचा मुद्दा मनसे आक्रमकपणे मांडताना दिसतेय. मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमवर मनसे मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मनसेच्या या मुद्द्याचा महापालिकेत कितपत फायदा होईल हे पाहावं लागेल.

Read More