Shree Trishunda Ganpati Mandir Pune Maharashtra : भारतात हजारो मंदिरे आहेत. असचं एक अनोखे मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे. पुण्यातील हे एक खूपच प्रसिद्ध मंदिर आहे. त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिर असे या मंदिराचे नाव आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील रहस्यमी तळघर वर्षातून एकदाच उघडते. या तळघरात गुडघाभर पाण्यातून समाधीकडे जाणारा रस्ता आहे. ही समाधी कुणाची आहे जाणून घेऊया.
भारतातील एकमेव त्रिशुंड मयुरेश्वर गणपतीचं मंदिर पुण्यातील रास्ता पेठेत आहे. इथे गणपती बाप्पाचे मंदिर भाविकांसाठी रोज खुलं असतं मात्र याच मंदिराच्या खाली जे तळघरातील तळपतगिरी गोसावी याचं मंदिर आहे ते फक्त गुरु पौर्णिमेनिमेच्या दिवशी उघडलं जातं. गुरु पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी पहाटेपासून मोठी गर्दी असते.
शिल्पवैभवाने नटलेले आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिव पावन असलेल्या श्री त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली वेगळी आहे. वेरूळच्या कोरीव लेणीदृश्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिरातील ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी 26 ऑगस्ट 1754 मध्ये या मंदिराची निर्मिती केली. तळघरात जिवंत झरा असल्यामुळे येथे पाणी भरते. तळघरात गुडघाभर पाण्यातून जाऊन समाधीचं दर्शन घ्यावं लागतं. त्रिशुंडी मंदिर पेशवेकालीन असले तरी ते पेशवेकालीन मंदिरांपेक्षा वेगळे आहे. पेशवेकालीन मंदिरांचे गर्भगृह दगडी व सभामंडप लाकडी असते, पण हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलेले आहे.