Harshvardhan Patil: इंदापूरमधील नेते हर्षवर्धन पाटील यांच्या घरवापसीची चर्चा सुरु झाली आहे. हर्षवर्धन पाटलांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली, त्यानंतर या चर्चेला उधाण आलं. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कमळ सोडून हाती तुतारी घेतलेल्या हर्षवर्धन पाटलांवर भाजप नाराज दिसतेय. कारण आता पाटलांना भाजपमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी शरद पवारांकडेच थांबावं असं बावनकुळे यांनी सांगितलंय.
विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातात घेऊनही हर्षवर्धन पाटलांचा विधिमंडळ प्रवेशाचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. इंदापुरातून पुन्हा एकदा दारुण पराभव झाल्यानंतर तेल गेलं आणि तूपही गेलं अशी राजकीय अवस्था हर्षवर्धन पाटलांची झाली. अशातच हर्षवर्धन पाटलांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. या भेटीमुळं हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये घरवापसी करणार का अशी चर्चा सुरु झालीये. हर्षवर्धन पाटलांनी मात्र मतदारसंघातल्या महसुली सुनावणीसाठी भेटल्याचं सांगितलं.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं. हर्षवर्धन पाटलांना भाजपमध्ये घेणार नसल्याचं बावनकुळेंनी सांगितलंय. हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांसोबतच राहावं असा सल्लाही त्यांनी दिलाय.
सत्तेची सावली नसल्यानं अनेक राजकीय नेत्यांची कोंडी झालीये. हर्षवर्धन पाटील 2014पासून विधिमंडळाची पायरी चढले नाहीत. पवारांकडं गेल्यास विधिमंडळाची वाट सुकर होईल असं त्यांना वाटलं होतं. पण तो प्रयोगही फसल्यानं आता हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपकडं परत जाण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येतंय. पण भाजपनं मात्र त्यांच्यासाठी दरवाजे बंद असल्याचं सांगितल्यानं पाटलांची अवस्था बिकट झाल्याचं सांगण्यात येतंय.