Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ईडीची पीडा टळल्याने हसन मुश्रीफांना दिलासा, किरीट सोमय्यांना मोठा धक्का!

Hasan Mushrif: किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना क्लिन चीट मिळण्याची मालिका सुरूच आहे. 

ईडीची पीडा टळल्याने हसन मुश्रीफांना दिलासा, किरीट सोमय्यांना मोठा धक्का!

Hasan Mushrif: संताजी घोरपडे साखर कारखाना प्रकरणात हसन मुश्रीफांना दिलासा तर किरीट सोमय्यांना मोठा धक्का बसलाय. संताजी घोरपडे कारखान्यातील कथित घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाकडून मुश्रीफांना दिलासा मिळालाय.या प्रकरणात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयान निकाली काढलीय.

किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना क्लिन चीट मिळण्याची मालिका सुरूच आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. संताजी घोरपडे साखर कारखाना प्रकरणात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द
करण्याची याचिका उच्च न्यायालयान निकाली काढलीय. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांना मोठा धक्का बसलाय.

मुश्रीफांची ईडीची पीडा टळली  

संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कथित शेअर घोटाळा प्रकरणात मुश्रीफांना दिलासा मिळालाय. शेतकऱ्यांना शेअर्स देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या आरोप सोमय्यांनी मुश्रीफांवर केला होता. आरोपावरून हसन मुश्रीफ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कागलच्या कनिष्ठ न्यायालयात पोलिसांनी सी-समरी रिपोर्ट सादर केलाय. या रिपोर्टमध्ये  मुश्रीफांविरोधात कोणताही पुरावा नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. परिणामी, मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात दाखल याचिका निकाली काढली.

एकीकडे उच्च न्यायालयानं दाखल गुन्ह्यातली याचिका निकाली काढलीय.. मात्र, दुसरीकडे हसन मुश्रीफांना कोणताही दिलासा मिळाला नसल्याचं समरजित घाटगे यांनी म्हटलंय. संताजी घोरपडे साखर कारखाना प्रकरणाचा कागल कोर्टात संबंधित खटला सुरूच असल्याचं समरजित घाटगेंनी म्हटलंय. 

हसन मुश्रीफांना दिलासा नाही. कागल कोर्टात अजूनही खटला सुरूच आहे. हसन मुश्रीफ मविआत मंत्री असतानाच किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर आरोपांचे बॉम्बगोळे डागले होते. संताजी साखर कारखान्यातील प्रकरण किरीट सोमय्यांनीच पुढे आणलं होतं..आणि त्याच आधारेच ईडीनेही मनी लॉन्डरिंगचा तपास सुरू केला होता. दरम्यान हा तपास सुरू झाल्यानंतर किरीट सोमय्यांनी मुश्रीफांना बॅग भरून जेलमध्ये जाण्यासाठी तयार रहा असा इशारा दिला होता.

मुश्रीफांच्या घरासमोर मोठा राडा 

सोमय्यांच्या आरोपांनंतर हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल करण्यात  आला होता. त्यानंतर 11 मार्च 2023 रोजी ईडीची टीम हसन मुश्रीफांच्या  घरी देखील दाखल झाली होती. दरम्यान यानंतर मुश्रीफांच्या घरासमोर मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मुश्रीफांच्या समर्थकांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन करत ईडीविरोधात देखील घोषणाबाजी केली होती. दरम्यान यावेळी हसन मुश्रीफ यांच्या पत्नीला देखील अश्रू अनावर झाले होते. आम्हाला गोळ्या घालून मारून टाका अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली होती.

11 मार्च 2023ला ईडीची दुसऱ्यांदा धाड

11 मार्च 2023 रोजी सकाळी हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीच्या पथकानं धाड टाकली होती. ज्यावेळी मुश्रीफांच्या घरी धाड पडली त्यावेळी हसन मुश्रीफ घरात नव्हते. घरात हसन मुश्रीफ यांच्या पत्नींसह काही महिला व मुलं होती. घरात सदस्य असतानाच ईडीकडून घराची झाडाझडती घेण्यात आली होती. दीड महिन्यातच दुसऱ्यांदा अशा पद्धतीने ईडीनं धाड टाकल्यानं मुश्रीफांच्या पत्नी सायरा मुश्रीफ या प्रचंड संतापल्या होत्या

ज्या प्रकरणात हसन मुश्रीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याबाबतची याचिका निकाली काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे मुश्रीफांना मोठा दिलासा मिळालाय. दुसरीकडे मुश्रीफांना जेलमध्ये जाण्यासाठी बॅग भरून ठेवा असं सांगणा-या सोमय्यांसाठी हा मोठा धक्का आहे. मात्र, शेवटी सोमय्यांनी सांगितलं तसंच झालं मुश्रीफ बॅग घेत थेट मंत्रिमंडळात सामिल झालेत.

Read More