ज्ञानेश सावंत, झी 24 तास मुंबई: आरोग्य विभागाच्या वाहन घोटाळ्यात रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर सध्याचा जो नवा कंत्राटदार आहे तो कंत्राटदार कागदावरच असल्याची माहिती समोर आलीये. 2019साली ज्या सात कंत्राटदारांनी ठेका घेतला होता तेच कंत्राटदार आजही कार्यरत असल्याची माहिती समोर आलीये.
राष्ट्रीय बाल स्वाथ्य मिशनमध्ये झालेला वाहन घोटाळा झी 24 तासच्या एसआयटीनं उघडकीस आणला. या घोटाळ्याच्या मुळाशी जाताना या प्रकरणात मोठा घोळात घोळ घातल्याचं लक्षात आलंय. मुळात कोणतंही कंत्राट एका वेळी एकालाच देता येतं. पण आरोग्यविभागातील भ्रष्टाचारी बाबूंनी वाहन पुरवण्याचं कंत्राट एकाच वेळी दोघांना देण्याची किमया साधलीये. आरोग्य विभागात 2019 पासून वाहन पुरवठ्याचं कंत्राट देण्यात आलंय.
हे कंत्राट लोकसेवा सुशिक्षित बेरोजगार सेवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी,स्वामी विवेकानंद स्वयंम रोजगार सेवा सहकारी संस्था,श्री. दत्त ट्रॅव्हल्स ईश्वर ट्रॅव्हल्स,सय्यद सिकंदर सय्यद अमर टूर्स ट्रॅव्हल्स,श्री. अष्टविनायक ट्रॅव्हल्स आणि महालक्ष्मी एन्टरप्रायझेस या कंपन्यांच्या नावे असल्याची माहिती हाती आलीये. सात कंत्राटदाराच्या मुदतवाढीनंतर हाती काम असतानाही डिसेंबर 2024मध्ये पुन्हा नव्यानं 1213 वाहनांच्या कंत्राटाचा घाट घालण्यात आला.
आरोग्य विभागातील अधिका-यांच्या मनात काय होतं कोणास ठाऊक होतं. त्यांनी भाडोत्री वाहनांसाठी पुन्हा निविदा काढली. सर्वात कमी किंमतीची निविदा नाशिकच्या एमव्हीजी कंपनीनं भरली. नवं कंत्राट देण्याची सगळी तयारी होत असताना जुने कंत्राटदार मात्र कायम होते.
2019 ते 2022 मध्ये वाहन पुरवठ्याचं 7 कंपन्यांना कंत्राट दिलं होतं. या कंपन्यांना डिसेंबर 2023मध्ये मुदतवाढ देण्यात आली. एक कंत्राट सुरु असताना एमव्हीजी कंपनीला पुन्हा कंत्राट देण्यात आलं. एवढंच नव्हे तर एमव्हीजी कंपनीकडून बँक गॅरेंटीही घेण्यात आली
आता नव्या ठेकेदाराला अंधारात ठेऊन जुने ठेकेदार महिन्याला 4 कोटींची बिलं काढत असल्याची माहिती समोर आलीये. ठेकेदारांच्या भ्रष्टाचाराच्या खेळात वाहनांची संख्या मात्र अपुरी आहे. राज्यात अनेक ठिकाणी बालकांची नियमीत तपासणी होत नसल्याची माहिती समोर आलीये. आरोग्य विभागात कंत्राटदार एक आणि रस्त्यावर धावणारी वाहनं दुस-या ठेकेदाराची असा सगळा सावळा गोंधळ सुरु आहे. या सावळागोंधळाचा फायदा अधिकारी भ्रष्टाचाराची मलई ओरपण्यासाठी घेत असल्याचं सांगण्यात येतंय. जादूची वाहनांच्या मदतीनं अधिका-यांचा भ्रष्टाचाराचा खेळ सुरु आहे का असा सवाल सामान्यांकडून विचारला जातोय.