Pune Rain : पुण्यात वादळी वा-यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस बरसला. वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे माळीण परिसरातील 11 गावांचा संपर्क तुटला आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
डिंभे धरण आणि माळीण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. माळीण कडे जाणारी वाहतुक बंद झाली आहे. माळीण परिसरातील 11 गावांचा संपर्क तुटला आहे.
डिंभे धरणाच्या खाली नव्याने सुरु असलेल्या पुलाचे काम सुरु असुन या पुलाजवळुन पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र, हा मार्ग पाण्यात गेला असुन माळीणकडे जाणारी वाहतुक बंद झालीय त्यामुळे नागरिकांनी धोकादायक पाण्यातुन प्रवास करु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील रेठरे धरण, पेठ परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे पेठ गावातून वाहणारी तिळगंगा नदी दूथडी भरून वाहू लागली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली होती..मात्र बुधवार पासून पावसाने हजेरी लावल्यामुळे गावातील ओढे-नाले देखील भरून वाहत आहेत.
दरम्यान, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ व्हावे यासाठी शेतकरी आता आक्रमक झाले आहेत नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अहिल्यानगर शेजारी असलेल्या चिचोंडी पाटील येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. मे महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली मुसळधार पावसामुळे नगर तालुक्यात खडकी, वाळकी, अकोळनेर, चिचोंडी पाटील भागाला मोठा फटका बसला. दरम्यान प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केलेत, मात्र ज्या शेतकऱ्यांचा कांदा शेतातच काढून पडला होता किंवा चाळीत ठेवण्यात आला होता त्याचा पंचनामा करण्यास प्रशासन नकार देत असल्याचे चिचोंडी पाटील येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अनेक ठिकाणी कांदा काढून ठेवला दोन दिवसात तो चाळीत भरायचा होता मात्र अचानक आलेल्या पावसाने त्याचे नुकसान झाले, मग त्याचे पंचनामे का केले जात नाहीत? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. प्रशासनाने सर्वच नुकसानीचे पंचनामे केले नाही तर येत्या काळात मोठे आंदोलन करण्याचा असल्याचा इशारा चिचोंडी पाटील गावचे सरपंच शरद पवार यांनी दिला आहे.