Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Weather Update मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अलर्ट. सतर्क राहण्याचे हवामान विभागाचे आवाहन. 

पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Mumbai Weather Update: राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांमधील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे समुद्रामधील आणि किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज 16 जुलै रोजी मुंबई आणि उपनगरांमधील काही भागात ढगाळ हवामान राहणार आहे. यावेळी अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे. त्यासोबतच हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील 24 तास धोक्याचे असल्याचा इशारा दिलाय. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे देखील आदेश दिले आहेत. 

या भागात असणार पावसाचा जास्त प्रभाव

सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 16 जुलै रोजी मुंबईसह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या काळात 40-50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता तसेच विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

त्याचबरोबर हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या ठिकाणी देखील पावसाचा जोर कायम असणार आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, नवीन मुंबई, पालघर आणि कल्याण-डोंबिवली या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

समुद्रात भरती-ओहोटी

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी वेगवान वाऱ्यासह चक्री वारे देखील वाहू शकतात. कारण मान्सूनचा प्रवास हा सध्या दक्षिणेकडे झुकलेला दिसत आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात जाण्यास टाळावे असं देखील सांगण्यात आलं आहे. यावेळी समुद्रात देखील भरती ओहोटी येणार आहे. यामध्ये भरती दुपारी 3.19 वाजता अंदाजे 4.41 मीटर पर्यंत असणार आहे. तर ओहोटी रात्री 9.11 वाजता अंदाजे 1.33 मीटर पर्यंत असणार आहे. 

Read More