Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मराठी कलाकारांना पडला मातृभाषेचा विसर; आतातरी आवाज उठवणार का?

Hindi Compulsory Controversy: गेल्या काही दिवसांपासून हिंदीसक्तीच्या मुद्यावरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. 

मराठी कलाकारांना पडला मातृभाषेचा विसर; आतातरी आवाज उठवणार का?

Hindi Compulsory Controversy: राज्यात हिंदी सक्तीवरून मराठीवर हल्ले होत असताना नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, प्रशांत दामले कुठे आहेत. असा सवाल शिवसेना UBT खासदार संजय राऊतांनी विचारलाय. तसेच मराठी कलाकार, क्रिकेटपटू लाचार असल्याने बोलत नसल्याचं विधान राऊतांनी केलंय.हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना राऊतांनी कलाकारांबाबत केलेल्या विधानाने नव्या वादाची शक्यता आहे.

हिंदीसक्तीच्या मुद्यावरून राज्यातलं वातावरण ढवळलं

गेल्या काही दिवसांपासून हिंदीसक्तीच्या मुद्यावरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. सरकार पहिलीपासून त्रिभाषा सूत्र आणण्याच्या तयारीत आहे. मात्र याआडून सरकार हिंदीची सक्ती करत असल्याचा आरोप राज ठाकरेंसह विरोधकांनी केलाय. आता यावरून संजय राऊत यांनी मराठी कलाकारांवर निशाणा साधलाय.महाराष्ट्रात हिंदीसक्ती विरोधात अनेकजण मैदानात उतरतायेत. पण आपले कलाकार नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, प्रशांत दामले आता कुठे आहेत असा प्रश्न त्यांनी विचारलाय.

साहित्यीकांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतायत

प्रकाशराज जसे कर्नाटकात उभे आहेत तसे हे कलाकार का नाही समोर येत, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. तर भाषासक्तीवर साहित्यीकांशी बोलण्याची गरज नाही..साहित्यीकांची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत, असं सडेतोड मतही व्यक्त केलं.

पाटेकर, दिक्षित यांनी पुढे यायला हवं

नाना पाटेकर यांचा मराठी बाणा अनेकदा महाराष्ट्राने अनुभवलाय.मात्र ज्या राज्यातील जनतेमुळे तुम्ही त्या पदावर पोहोचलाय. त्या भाषेसाठी नाना पाटेकर, माधुरी दीक्षित यांनी आता पुढं आलं पाहिजे, बोललंच पाहिजे असं चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी म्हंटल.

आपल्या मराठीसाठी कलाकार आवाज उठवतील का?

नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, प्रशांत दामले या कलाकारांना, त्यांच्या चित्रकृतींना मराठी प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिलं, दाद दिली., अगदी डोक्यावर घेतलं...नाना, माधुरी यांच्या हिंदी सिनेमाला भाषेच्या पलीकडे जाऊन खुल्या दिलाने कवटाळलं...पण ज्या भाषेने तुम्हाला घडवलं त्याच भाषेचा कलाकारांना विसर पडल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. मराठीने कधी कोणत्या भाषेचा दुस्वास केला नाही, पण दुसरी भाषा आपल्या चिमुकल्यांवर लादली जात असेल तर मात्र विरोध होणारच. आतातरी कलाकार मराठीसाठी, आपल्या भाषेसाठी आवाज उठवतील का, हे पाहावं लागेल.

Read More