Mock Drill in Maharashtra Latest News in Marath: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणारा तणाव दिवसागणिक आणखी वाढला असून, या तणावाच्या परिस्थितीमध्ये आता नव्यानं भर पडल्याचं पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानमधील संघर्ष गंभीर वळण घेताना दिसत असून, एकिकडे युद्धाच्या चर्चांनीही डोकं वर काढलं. याच परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्रालयानं अनेक राज्यांना युद्धसज्जतेच्या धर्तीवर मॉक ड्रील घेण्याचे निर्देश दिले.
युद्धकाळातील उपायांचा सराव या मॉक ड्रीलअंतर्गत घेतला जाणार असून यादरम्यान नागरिकांनी युद्धजन्य परिस्थिती आणि हवाई हल्ल्यांदरम्यान स्वत:चं आणि इतरांचं संरक्षण नेमकं कसं करायचं यासंदर्भातील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तणावाच्या या परिस्थितीत सातत्यानं वाढ होत असल्यानं हे मॉकड्रील घेतलं जाणार असून, महाराष्ट्रातील 16 ठिकाणांवर त्याचा सराव पार पडेल.
मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, नाशिक, नागोठणे, मनमानड, सिन्नर, थळवायशेत, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं हे मॉकड्रील पार पडेल.
देश स्तरावर एकूण 244 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रील पार पडणार असून, 1971 नंतर देशात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर नागरिक सुरक्षिततेच्या हेतूनं हे पाऊल उचलण्यात आल्यामुळं ही सध्याच्या क्षणाची मोठी घडामोड ठरत आहे.