HSC Board Exam 2025 : विरारमध्ये 12 वीच्या उत्तरपत्रिका जळाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षीकेने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी आणल्या होत्या. मात्र, घरात लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण उत्तर पत्रिकेचा गठ्ठा जळाला. यामुळे खळबळ माजली आहे. याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात सध्या शिक्षण विभागाकडून बारावी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. विरार मध्ये राहणाऱ्या एका शिक्षिकेने उत्तर पत्रिका तपासण्यासाठी घरी आणल्या होत्या. कामानिमित्त शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. त्यांचे घर बंद असतानाच शॉर्ट सर्किट झाल्याने घरामध्ये मोठी आग लागली, ज्यामध्ये या पेपरसह घरातील इतर सामानही जळून खाक झाले आहे. घरात लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण उत्तर पत्रिकेचा गठ्ठा जळून खाक झाला आहे. विरार पश्चिम आगाशी परिसरात ही शिक्षिका राहणारी असल्याची माहिती समोर येत आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
बारावीच्या उत्तर पत्रिका शाळेत तपासणे बंधनकारक असताना या उत्तर पत्रिका घरी कशा पोहोचल्या असा प्रश्न उपस्थित होतोय. प्राथमिक माहितीत प्राध्यापकाने उत्तर पत्रिका शिक्षकांना तपासायला दिल्या होत्या. उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली होती. दरम्यान या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येईल, आणि कारवाईही केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंनी दिली.
उत्तरपत्रिका शाळेत तपासल्या पाहिजेत असा नियम असताना या शिक्षिकेने नियम मोडत उत्तरपत्रिका घरी तपासायला आणल्या, आणि त्या जळाल्या. आता या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.
उत्तरपत्रिका जळाल्याप्रकरणी शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु-मार्च 2025 च्या उत्तरपत्रिका जळाल्याची घटना विरार येथे घडली. या उत्तरपत्रिका वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (ओसी) या विषयाच्या असून उत्तरपत्रिकांचे परीक्षण करण्यासाठी मंडळामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षकाने त्यांच्याकडील 300 उत्तरपत्रिका (परीक्षण करून) तपासून उत्तरपत्रिका कस्टोडियन असलेले प्राचार्य यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या होत्या. संबंधित कस्टोडियन प्राचार्य यांनी उत्तरपत्रिका नियामक यांच्याकडे सुपूर्द केल्या. सदर उत्तरपत्रिका नियामक यांच्यामार्फत घरी नेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे व त्यांच्या घराला आग लागल्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या उत्तरपत्रिकांपैकी 175 उत्तरपत्रिका जळाल्या असल्याची माहिती नियामकाने राज्य परीक्षा मंडळास दिली आहे.
उत्तरपत्रिका या नियामकाने कनिष्ठ महाविद्यालयातच तपासणे राज्य परीक्षा मंडळाच्या नियमावलीनुसार बंधनकारक असूनही सदर नियामकाने उत्तरपत्रिका घरी नेल्याचे आढळून आले आहे. सदर उत्तरपत्रिका घरी नेण्यास परवानगी देणे हे देखिल राज्य परीक्षा मंडळाच्या मार्गदर्शक पुस्तिकेनुसार नियमबाह्य आहे. तरीही प्राचार्यांनी उत्तरपत्रिका घरी नेण्यास परवानगी दिली आहे. मंडळाच्या नियमाचा व गोपनियतेचा भंग केल्याने सबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक यांच्यावर मंडळाच्या नियमान्वये उत्तरपत्रिकांचे नुकसान करणे या कारणास्तव बोळींज, पोलिस ठाणे, विरार येथील पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सदर प्रकरणी मंडळ नियमावली व शिक्षासूचीनुसार प्राचार्य व शिक्षिकांवर चौकशी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.