HSC Result 2025: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली हे पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. याप्रकरणी वाल्मिक कराड आणि टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील न्यायालयीन प्रक्रीया सुरु आहे. वडीलांची हत्या झाली त्याच काळात बारावीची परीक्षा होती. घरावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना संतोष देशमुखांची लेक वैभवीने परीक्षा दिली होती. आज बारावीचा निकाल समोर आलाय. त्यात वैभवी संतोष देशमुख यांच्या निकालाचीही चर्चा होतेय. तिचं कौतुक केलं जातंय.
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची लेक बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. नुसती उत्तीर्णच नव्हे तर तिला तब्बल 85.33 टक्के इतके गुण मिळाले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. निकाल असल्याने वैभवी वडिलांच्या आठवणीने भावुक झालेली दिसली. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आज माझे वडील नाही, याचं दु:ख होतं, अशी प्रतिक्रिया वैभवीने दिली. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच लागल्याची भावनादेखील यावेळी तीने व्यक्त केली.
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख ही आपल्या पित्याला न्याय मिळावा यासाठी लढा देताना दिसली. ती खूप संयमाने परिस्थितीला सामोरे गेली. आपल्या पित्याला न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या प्रत्येक मोर्चात ती सहभागी झाली होती. पित्याच्या निधनामुळे ती आतून खचली पण तिने धीर सोडला नाही. तिने परिवाराला संभाळून घेतलं. आपल्या पित्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेतली होती.
सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी बारावीत अव्वल मार्क घेऊन उत्तीर्ण झाली. वैभवी देशमुखला बारावीच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळाले. परीक्षेच्या निकालाच्या आनंदापेक्षा वडिलांचे दुःख मोठं. यापुढेही न्यायाची लढाई सुरूच राहणार, अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुखने दिलीय. आजच्या दिवशी पाठीवर थाप देण्यासाठी वडील नाहीत, असे म्हणत तिने मनातील खंत व्यक्त केली. परीक्षा देण्याची मानसिकता नव्हती. मी स्वतःच्या पायावर उभा रहावं असं वडिलांचे स्वप्न होतं. या घटनेनंतर माझं आयुष्यच बदलून गेलं. दुःखाचा डोंगर कोसळला. विचार बदलले. पूर्वी करिअरचा विचार करायचे. मला डॉक्टर व्हायचं होतं, असेही ती म्हणाली. संतोष देशमुख खून खटल्याचं प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावं, अशी मागणी तिने केलीय.