Walmik Karad Encounter Offer: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये अटकेत असलेला प्रमुख आरोपी वाल्मिक कराडसंदर्भात एक धक्कादायक खुलासा एका माजी निलंबित पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची मला सुपारी आली होती, असं या निलंबित अधिकाऱ्याने म्हटलं आहे. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली असून राज्यात अनेक एन्काऊंटर बोगस होते असंही म्हटलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, वाल्मिकच्या एन्काऊंटरची सुपारी मिळाल्याचा दावा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचं नाव रणजीत कासले असं आहे. कासले हे पोलीस उपनिरीक्षक असून सध्या निलंबित आहेत. परळी नगर परिषदेचे गटनेते म्हणून कार्यरत राहिलेल्या वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची सुपारी मला देण्यात आली होती, असं कासलेने म्हटलं आहे. कासलेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत हा धक्कादायक दावा केला आहे. तसेच इतक्यावर न थांबता कासलेने, "राज्यातील अनेक एन्काऊंटर बोगस होते", असा दावाही कासलेने केला आहे.
आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा ठपका ठेवत कासलेंना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच कासले यांनी यापू्र्वीही अनेकदा असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्याचं दिसून आल्याने त्यांच्यावर आधीही पोलीस खात्याकडून कारवाई करण्यात आलेली. वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरबद्दल कसलेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन व्हिडिओ प्रसारित केल्याने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुरु असलेल्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये वाल्मिक कराडने धक्कादायक दावा नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान केला. आरोपी वाल्मीक कराडने बीड न्यायालयात खटल्यातून वगळण्याचा म्हणजेच डिस्चार्ज आपलिकेशन दाखल केला आहे. "या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, मला या खटल्यातून वगळावं," असा थेट दावा करत आरोपीने न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी कडाडून विरोध करत, “शिवनीती वापरून वाल्मीकरांचा डाव उधळून लावला” असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 10 एप्रिल रोजी पत्रकारांशी बोलताना उज्जवल निकम यांनी, "आज पार पडलेल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलाने डिस्चार्ज अर्ज मांडला. मात्र सरकार पक्षाने वेळ मागितली. आता या अर्जावर पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे," असं सांगितलं.
वाल्मिक कराड हा अजित पवारांच्या पक्षातील नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने या प्रकरणावरुन मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.