Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अवैधरित्या दारुची तस्करी, एकाच नंबरच्या २ गाड्या ताब्यात

मोठा मद्यसाठा नागपूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.

अवैधरित्या दारुची तस्करी, एकाच नंबरच्या २ गाड्या ताब्यात

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : मध्यप्रदेशातून छत्तीसगढ राज्यात विक्रीसाठी अवैध रित्या नेण्यात येत असलेला मोठा मद्यसाठा नागपूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणी दोन वाहनांसह दोन आरोपींना उत्पादन शुल्क विभागाने अटक केली असून त्यांच्याकडून ४ हजार २५० बॉटल दारू जप्त केली आहे. विशेष म्हणजे बनावट आरटीओ क्रमांकाच्या वाहनांमधून ही दारू तस्करी केली जात होती.

मध्य प्रदेशातून छत्तीसगढ मध्ये अवैध विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दारू साठा नेत असल्याची गुप्त माहिती नागपूर अबकारी विभागाला मिळाली. माहितीच्या आधारे आबकारी चमूने सापळा रचून एका वाहनाला मानकापूर तर दुसऱ्या वाहनाला वंजारी नगर येथे ताब्यात घेतले. यावेळी वाहनातील इतर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. वाहनांची तपासणी केल्यावर त्यात मध्यप्रदेशात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा आढळून आला. उत्पादन शुल्क विभागाने याप्रकरणी एक महिंद्रा बोलेरो व एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीसह दोन आरोपींना ताब्यात घेतले. 

अजय बांते (वय ३४ वर्षे,राहणार वांजरीनगर,नागपूर) व नवज्योतसिंह धारिवाल (वय २१ वर्षे,राहणार दुर्ग,छत्तीसगढ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. विशेष म्हणजे या गाड्यांची आरटीओ नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट ही बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. एका बाजूला महाराष्ट्र तर दुसऱ्या बाजूला छत्तीसगढ आरटीओचा नोंदणी क्रमांक लिहलेली नंबर प्लेट या वाहनावर लावण्यात आली होती. 

वाहन ज्या राज्यात चालवण्यात येत असेल त्या राज्यातील वाहन क्रमांकाची नंबर प्लेट बदलविण्यात येत असे. वाहनांचा खरा आरटीओ वाहन क्रमांक कोणता याचा तपास आरटीओ मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
 

Read More