IMD Alert Issued Maharashtra Heavy Rains Today: बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, रविवारीही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रायगड, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह कोकणात अधूनमधून जोरदार सरी कोसळतील. सोमवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. दरम्यान, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई आणि पुण्यात शनिवार-रविवारी पावसाने हजेरी लावण्याची शक्यता असून, हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी मुंबईसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 97 मिमी पावसाची नोंद झाली असून, तापमान 25 ते 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. 26 आणि 27 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज असून आकाश प्रामुख्याने ढगाळ राहणार आहे. शहरातील नीच भाग आणि सखल परिसरात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
28 जुलैनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची चिन्हं असून, हलकासा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, पुण्यात हवामान तुलनेने सौम्य असून, मागील 24 तासांत केवळ 13 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 26 आणि 27 जुलै रोजी मध्यम पाऊस, तर 28 व 29 जुलै रोजी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा 22 ते 26 अंशांच्या दरम्यान राहील. पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मुंबईत जिथे जोरदार पावसाचा मारा सुरू आहे, तिथे पुण्यात पाऊस तुलनेत स्थिर आणि सौम्य राहणार आहे. दोन्ही शहरांतील नागरिकांनी दररोजच्या हवामान अपडेटवर लक्ष ठेवावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोर पकडला असून, महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळी 8:30 ते शनिवारी सकाळी 8:30 या कालावधीत येथे तब्बल 257.8 मिमी पाऊस पडला. यामुळे हंगामातील एकूण पावसाची नोंद आता 3261.1 मिमीवर पोहोचली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असून, मागील तीन-चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. शनिवारी कुंडलिका नदीने इशारा पातळी पार केली, तर जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पातळीतही वाढ झाली असली तरी ती सध्या इशारा पातळीच्या खाली आहे. प्रशासनाने नद्यांच्या किनाऱ्यावरील गावांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले असून, पुरपरिस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेता स्थानिक यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.