11 Story Railway Station: मुंबईच्या उपनगरांपैकी एक महत्त्वाचं शहर असलेल्या ठाण्यामध्ये चक्क 11 मजल्यांचं रेल्वे स्थानक उभारलं जाणार आहे. या रेल्वे स्थानकामध्ये केवळ रेल्वे गाड्या येणार-जाणार नाहीत तर इथे अनेक सुविधा उपलब्ध असतील. या ठिकाणी लोकांच्या मनोरंजनाचीही विशेष सोय केली जाणार आहे. या बहुमजली स्थानकामध्येच मॉल, कार्यालयीन व्यवस्था आणि रिटेलची दुकानं असतील. हा प्रोजेक्ट रेल्वे कनेक्टीव्हिटीबरोबरच सरकारला महसूल मिळवून देण्यात फायद्याचे ठरतील.
ठाणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 10 ए जवळ 9000 वर्ग मीटरवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. याचबरोबर 24,280 वर्गमीटरची जागा लीजवर देण्यासाठी उपलब्ध असेल. या जागा 60 वर्षांच्या लीजवर दिल्या जातील असं सांगितलं जात आहे. हा प्रकल्प 30 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. हे स्थानक बस आणि मेट्रो मार्गाने जोडलं जाणार आहे.
या रेल्वे स्थानकाच्या बेसमेंटमध्ये पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच या ठिकाणी इतरही सोयी सुविधा पुरवल्य जाणार आहे. याच स्थानकामधील एक डेक बस गाड्यांसाठी असणार आहे. येथून स्थानिक म्हणजेच शहराअंतर्गत जाणाऱ्या बस मिळतील. तळाच्या दोन मजल्यांवर या सर्व सुविधा पुरवल्या जातील. वरच्या मजल्यांवर कमर्शिअल दुकानं आणि इतर सुविधा पुरवल्या जातील. या मजल्यांवर शॉपिंग आणि रिटेल दुकानं तयार केली जातील.
या रेल्वे स्थानकामुळे केवळ कनेक्टीव्हिटी वाढणार नाही तर लोकांना अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. याच इमारतीमध्ये फूड कोर्ट, रेस्तराँही असतील. या ठिकाणी लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी गेमिंग झोनही असेल. कार्यालयीन कामांसाठी येथे जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. हॉटेल आणि इतर सेवांबरोबरच या ठिकाणी कोचिंग इन्स्टीट्यूसही उभारले जाणार आहेत.
या स्थानकाला ट्रेनबरोबरच इतर सार्वजनिक वाहतुक सेवांशीही जोडलं जाणार आहे. यामध्ये 2.24 किलोमीटरचा एलिव्हेटेड मार्ग तयार केला जणार आहे. हा मार्ग थेट इस्टर्न एक्सप्रेस-वेशी कनेक्ट केला जाणार आहे. त्यामुळे थेट रेल्वे स्थानकावरुन ये-जा करता येईल. प्लॅटफॉर्म 10 जवळ बससाठी विशेष डेक तयार केला जाणार आहे. म्हणजे ट्रेनने आलेल्यांना थेट बस पकडता येईल. हा प्रकल्प रेल्वे विकास प्राधिकरण आणि ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त उपक्रमातून साकारला जात आहे.