Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

इंटरनॅशनल लखोबा लोखंडे गजाआड, लग्नाच्या आमिषानं 3 कोटी 60 लाखांचा गंडा

ऑस्ट्रेलियात राहणारा पण मूळचा भारतीय असलेल्या या लखोबा लोखंडेनं पुण्यातल्या एका घटस्फोटीत महिलेला 3 कोटी 60 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. 

इंटरनॅशनल लखोबा लोखंडे गजाआड, लग्नाच्या आमिषानं 3 कोटी 60 लाखांचा गंडा

चंद्रकांत फुंदे, (प्रतिनिधी) पुणे : लग्नाचं आमिष दाखवून पुण्यातल्या एका महिलेला तब्बल 3 कोटी 60 लाखांना गंडा घालणा-या इंटरनॅशनल लखोबा लोखंडेला पोलिसांनी अटक केलीय. मूळचा लखनौचा असलेला पण ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या या लखोबानं तब्बल 3 हजार महिलांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता.

पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेला हा इंटरनॅशनल लखोबा लोखंडे उर्फ डॉ. रोहित ओबेरॉय उर्फ अभिषेक शुक्ला. ऑस्ट्रेलियात राहणारा पण मूळचा भारतीय असलेल्या या लखोबा लोखंडेनं पुण्यातल्या एका घटस्फोटीत महिलेला 3 कोटी 60 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. पीडित महिला ही पुण्यात वास्तव्यास असून ती शालेय विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम राबवत होती. मॅट्रोमॉनिअल साईटवर त्यांनं पीडितेला आपण बिझनेस मॅनेजमेंटमधील डॉक्टरेट केली असून आपलं नाव रोहित ओबेरॉय असल्याचं त्यानं सांगितलं. पीडितेचा विश्वास संपादन करुन व्यवसाय वाढीसाठी त्यानं टप्प्याटप्प्यानं 3 कोटी 60 लाख रुपये उकळले.

पैसे उकळल्यानंतर डॉक्टर रोहित ओबेरॉय गायब झाला. कालांतरानं तोंडाच्या कॅन्सरमुळं मृत्यू झाल्याचा मेल इव्हॉन हॅन्दयानी, विन्सेंट कुआन यांनी पीडितेला पाठवला.. पीडित महिलेला या सगळ्या गोष्टी संशयास्पद वाटल्या. पीडितेनं पोलिसांत तक्रार केल्यानंतर या प्रकरणाच्या खोलात गेल्यावर डॉ. रोहित ओबेरॉय नावाचा माणूस अस्तित्वात नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

आरोपीचं खरं नाव अभिषेक शुक्ला असल्याचं तपासात समोर आलं. तो मूळचा लखनौचा असला तरी तो ऑस्ट्रेलियन नागरिक असल्याचं तपासात समोर आलं. आरोपी ऑस्ट्रेलियाहून सिंगापूरमार्गे मुंबईत आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला विमानतळावर अटक केलीय. अभिषेक शुक्लाच्या मॅट्रोमोनिअल वेबसाईटवरील अकाऊंटवर तपास केल्यानंतर त्यानं एक दोन नव्हे तर 3 हजार 194 महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती हाती आलीये. 

अभिषेक उर्फ इंटरनॅशनल लखोबा लोखंडे आता पुणे पोलिसांच्या कोठडीत असून त्यानं किती महिलांची आर्थिक फसवणूक केलीये याचा पोलीस तपास करतायेत. मेट्रोमॉनिअल वेबसाईटवरुन फसवणुकीची प्रकरणं वाढली असताना या इंटरनॅशनल लखोबा लोखंडेच्या प्रकरणानं पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढवलीये.

Read More