Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कोरोनाबाधित रुग्णांसाठी 18 दिवसांतच उभारला ऑक्सिजन प्रकल्प

अवघ्या 18 दिवसांतच हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारा प्रकल्प तयार

कोरोनाबाधित रुग्णांसाठी 18 दिवसांतच उभारला ऑक्सिजन प्रकल्प

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : सध्या राज्यभरात कोरोनाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागलाय. अशा परिस्थितीत जालन्यातील पोलाद स्टील या स्टील कंपनीने कोरोनाबाधित रुग्णांसाठी सामाजिक दायित्व दाखवत अवघ्या 18 दिवसांतच हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारा प्रकल्प उभा केलाय.

या प्रकल्पातुन दररोज 300 सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती होत असून  निर्माण केलेल्या 300 सिलेंडर पैकी 250 सिलेंडर गरजू कोरोना बाधित रुग्णांना मोफत दिली जातायत.प्रशासनाने पोलाद स्टील या कंपनीला ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्यासाठी आवाहन केलं होतं. त्यानंतर अवघ्या 18 दिवसांतच कंपनीने हा प्रकल्प उभा केला.

दररोज उत्पादित होणाऱ्या 300 सिलेंडर पैकी केवळ 50 ऑक्सिजन सिलेंडरची कंपनीला गरज आहे. तर 250 सिलेंडर जिल्ह्यातील खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना मोफत पुरवठा केला जातोय.फक्त गरजू रुग्णांसाठी एकच अट कंपनीकडून ठेवण्यात आलीय.

ज्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे,त्या रुग्णाच्या नातेवाईक अथवा ओळखीच्या व्यक्तीने यासाठी संबंधित दवाखान्याच्या डॉक्टरांचं प्रमाणपत्र कंपनीत घेऊन यायचं आहे. त्यानंतर लगेचच कंपनीकडून ऑक्सिजन सिलेंडरचा रुग्णांसाठी मोफत पुरवठा केला जातोय.पोलाद स्टीलने कोरोना बाधित रुग्णांसाठी घेतलेल्या या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More