Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रात पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; कार रिव्हर्स घेतली आणि अंगावर घातली

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

  महाराष्ट्रात पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; कार रिव्हर्स घेतली आणि अंगावर घातली

Jalgaon Crime News : महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. जळगावमध्ये पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपींनी या पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. या पोलिस अधिकाऱ्याने मात्र, आरोपींना अटक करुन दिली. त्यामुळे त्यांच्या धाडसाचे देखील कौतुक होत आहे. 

संदीप पाटील असे जखमी पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. संदीप पाटील हे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. या घटनेमध्ये संदीप पाटील बालंबाल बचावले असून त्यांना बोटाला, पायाला आणि पोटाजवळील बारगड्यांना दुखापत झाली आहे. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असतानी आरोपींनी  चारचाकी वाहन रिव्हर्स घेत संदीप पाटील यांच्या अंगावर घालत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला बैल तसेच चार चाकी वाहन तसेच छोटी तलवार, गुप्ती तसेच लोखंडी रॉड या शस्त्रांसह असा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेमकं काय घडल?

जळगाव जिल्ह्यात गस्त घालत असताना पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे मुक्ताईनगर येथून गुरांची तस्करी करणाऱ्या वाहनाला तसेच आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी आरोपी वाहनासह पसार झाले. या दरम्यान पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तब्बल 100 किलोमीटर पर्यंत जळगाव ते अकोल्यापर्यंत आरोपीच्या वाहनाचा पाठलाग केला.
अकोला पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करण्यात आली. यावेळी आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने वाहन रिव्हर्स घेऊन पोलीस निरीक्षकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील खाली पडले. त्यानंतर त्यांनी आहे त्या अवस्थेत उभे राहून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यादरम्यान इतर तिघे फरार झाले. घटनेत पोलिस निरीक्षक संदीप पाटील जखमी झाले असून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जळगाव ते अकोला तब्बल शंभर किलोमीटरच्या पाठलाग करून आरोपीला अटक करणारा संदीप पाटील यांच्या धाडसाचे पोलीस दलात कौतुक केलं जात आहे. या घटनेबाबत पोलिस अधीक्षक यांनी प्रतिक्रिया दिली आहे घटनेची माहिती देत या प्रकरणात चोरी गेलेला बैल चार चाकी वाहन तसेच दोन आरोपींना अटक करण्याची माहिती त्यांनी दिली आहे.

 

Read More