जालन्यात सुनेनं सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीत भरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 45 वर्षीय संगिता संजय शिनगारे असं या मयत महिलेचं नाव आहे. जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील ही घटना आहे. हा घटनेने संपूर्ण परिसर आणि जालना शहर धक्यात आहे.
भिंतीवर डोकं आपटून सुनेकडून सासूची हत्या करण्यात आली. गोणीत भरलेला मृतदेह उचलता आला नसल्यानं मृतदेह घरातच सोडून सून फरार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही बाब घरमालकाच्या लक्षात येताच ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पचंनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान पोलीस फरार आरोपी सुनेचा शोध घेत आहेत.
सुनेने सासूची हत्या केली आहे. या प्रकारात सुरुवातीला मयत सासूच्या डोक्याला मारहाण झाल्याचं दिसत आहे. पोस्टमार्टम आणि इतर अहवालानंतर तपशीलवार माहिती मिळेल. सून सासूची हत्या करुन फरार होणार होती. मात्र गोणीत भरलेला मृतदेह घेऊन जाता येत नसल्यामुळे सून फरार झाल्याची प्राथमिक माहिती आयुष नोपाणी, अतिरीक्त पोलीस अधीक्षक, जालना यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार रात्री किंवा पहाटे घडल्याच पोलीस सांगत आहेत. सूने प्रतिक्षा शिनगारेने भिंतीवर डोकं आपटून सासूची हत्या केली आहे. सून एवढ्यावरच थांबली नाही तर तिने यानंतर 45 वर्षीय सासूचा मृतेदह गोणीत भरला. मृतदेहाची विल्हेवाट लावता आली नाही म्हणून तो तसाच राहत्या भाड्याच्या घरात ठेवून सून पसार झाली आहे.