Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव कराडमध्ये दाखल

नौशेरा सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी लढताना संदीप यांना वीरमरण आलं 

शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव कराडमध्ये दाखल

कराड, सातारा : काश्मिरमधील नौशेरा सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेल्या  सातारा जिल्ह्यातील मुंडे गावचे जवान संदीप सावंत यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण झाली असून शाहिद जवान संदीप सावंत यांचं पार्थिव कराडमध्ये दाखल झालं आहे. 

सुरुवातीला कराडच्या ऐतिहासिक विजय दिवस चौकात  हे पार्थिव आणण्यात येईल. या चौकातच काही काळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यांनतर विजय दिवस चौक ते कराड मधील कोल्हापूर नाकापर्यंत अंत्ययात्रा काढली जाईल. त्यानंतर हे पार्थिव जवान संदीप सावंत यांच्या मूळ गावाकडे नेलं जाणार आहे. 

संदीप सावंत सहा मराठा बटालियनमध्ये होते. नववर्षाच्या पहाटे संदीप सावंत यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेजवळ जंगलात हालचाली दिसल्या. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संदीप सावंत आणि गोरखा रायफल्सचे अर्जुन थापा या दोघांना वीरमरण आले. 

संदीप सावंत २८ सप्टेंबर २०११ रोजी सैन्यात भरती झाले होते. त्यांचे लग्नही झाले आहे. १२ वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करुन १८ मराठा बटालियनमध्ये सहभागी झाले होते. संदीप सावंत यांनी भरतीनंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीर येथे सेवा बजावली होती. संदीप सावंत शहीद झाल्याच्या बातमीनंतर त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. 

  

Read More