Gopichand Padalkar On Jitendra Awhad Alligation: विधानभवनाच्या इमारतीच्या लॉबीमध्ये गुरुवारी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणावर पडळकर यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. माझ्या सहकाऱ्यांकडून चूक झाली. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, असं पडळकरांनी म्हटलं आहे. इतक्यावरच न थांबता आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत असंही पडळकर म्हणालेत. या शिवाय पडळकरांनी तुमच्या इशाऱ्यानंतर हल्ला झाला या आव्हाड यांनी केलेल्या आरोपांवरही उत्तर दिलं आहे. मात्र एका प्रश्नानंतर पडळकरांनी काढता पाय घेतल्याचं दिसून आलं.
विधानभवनातील राड्याबद्दल विचारलं असता पडळकरांनी पत्रकारांना, "काल मी माझी भूमिका व्यक्त केली आहे. मी अध्यक्षांकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली होती. मी विनंती केली होती की आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली आहे. त्यांना सक्त ताकीद देऊन तुमची जी काही कारवाई असेल ती करा. त्यामुळे त्यांच्या अधिकारातील हा विषय आहे. रात्री उशीरा त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्यावर आमचं कुठलच मत नाही," असं उत्तर दिलं. पुढे बोलताना, "आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कोर्टाच्या करावाईला आम्ही सामोरे जाऊ," असं पडळकर म्हणाले.
तुम्ही कार्यकर्त्यांना हात दाखवला आणि मग हल्ला झाला असा दावा करणारा व्हिडीओ आव्हाडांनी शेअर केला आहे, असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पडळकरांनी, "अरे तुम्ही बघा ना! तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा नाही. आम्ही कोपऱ्यात होतो. सगळे व्हिडीओ काढा ना. 10-15 मिनिटं मी तिथे होतो. कार्यकर्त्यांबरोबर फोटो काढून तिथे उभा होतो. काल माझी लक्षवेधी होती. अर्धा तास चर्चा होती. अख्खा दिवस मी कामकाजामध्ये होतो. 9 लक्षवेधी झाल्या माझी दहावी होती. मला म्हणाले उद्या. अर्धा तासाची चर्चा. मी सकाळीच 9 वाजता आलोय. मी अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही. मी निघालो होतो. तुम्ही बघितलं," असं उत्तर दिलं. "आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. आम्ही त्याचा आदर करतो," असं पडळकर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
नक्की वाचा >> आव्हाड पोलिसांच्या कारखाली, खेचून बाहेर काढलं अन्...; मध्यरात्री विधानभवनात तुफान राडा! पाहा Video
तुम्ही कार्यकर्त्यांना का अडवलं नाही? असा प्रश्न विचारला जातोय. अशी विचारणा करण्यात आली असता पडळकरांनी उत्तर देणं टाळलं आणि ते हिंदी चॅनेलच्या पत्रकारांशी बोलू लागले.