Jitendra Awhad vs Gopichand Padalkar Sanjay Raut Reacts: विधानभवनाच्या आवारात आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. विधानभवनाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या मुख्य इमारतीच्या लॉबीमध्ये आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणावरुन वातावरण चांगलेच तापलेले आहे. मध्यरात्रीनंतरही या प्रकरणावरुन तुफान राडा सुरु होता. असं असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात हे काय पेरलंय? असा सवाल उपस्थित करत घडलेल्या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला आहे.
राऊत यांनी गुरुवारी विधानभवनात झालेल्या मारहाणीला 'गँग वॉर' असं म्हटलं आहे. पुढे बोलताना राऊत यांनी, "भाजपाने विधीमंडळात गुंडांच्या टोळ्या आणल्या" असंही म्हटलंय. "महाराष्ट्राच्या विधानभवनात आज गँग वॉर झाले," असं म्हणत राऊत यांनी विधानभवनातील हाणामारीवरुन संताप व्यक्त केला आहे. "भारतीय जनता पक्षाने विधीमंडळात आणि त्यांच्या पक्षात गुंड टोळ्या आणल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र राज्याची संस्कृती उध्वस्त झाली आहे. फडणवीस हे गृहमंत्री आहेत. त्यांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाली," असा घणाघात राऊत यांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) पोस्टमधून केला आहे.
"आज ज्याने विधानभवनात दंगल केली ते आमदार पडळकर टीम देवेंद्रचे सदस्य आहेत. मोदी-शहा यांनी महाराष्ट्रात हे काय पेरले आहे?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. "अत्यंत वेदनादायी असे हे चित्र आहे! खरंच कुठे नेऊन ठेवलाय शिवरायांचा महाराष्ट्र?" असा प्रश्न पोस्टच्या शेवटी राऊतांनी विचारला आहे.
महाराष्ट्राच्या विधानभवनात आज गँग वॉर झाले.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2025
भारतीय जनता पक्षाने विधीमंडळात आणि त्यांच्या पक्षात गुंड टोळ्या आणल्या आहेत,
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र राज्याची संस्कृती उध्वस्त झाली आहे,
फडणवीस हे गृहमंत्री आहेत,
त्यांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाली!
आज ज्याने… pic.twitter.com/2r2iuQypTQ
दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद रात्रभर विधानभवन परिसरामध्ये आणि नंतर आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये पाहायला मिळाले. आव्हाड यांनी ज्या कार्यकर्त्याने मार खाल्ला आहे त्या नितीन देशमुखलाच पोलीस ताब्यात घेत असल्यावरुन आक्षेप नोंदवत पोलिसांच्या कारसमोर ठिय्या आंदोलन केलं. कार्यकर्त्यांना सोडेपर्यंत आपण कार समोरुन हटणार नाही अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली. अखेर ऐनवेळी कार बदलत नितीन देशमुखला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. मात्र या सर्व राड्यादरम्यान आव्हाड कार रोखण्यासाठी अगदी पोलिसांच्या कारखाली आल्याचं दिसलं. पोलिसांनी खेचून आव्हाड यांना बाहेर काढलं. आव्हाड यांनी नंतर आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कार्यकर्त्यांसहीत ठिय्या आंदोलन केलं. या वेळेस आमदार रोहित पवारही उपस्थित होते. या प्रकरणावरुन आज दिवसभर राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.