Who is Nitin Deshmukh: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर नितीन देशमुख यांचं नाव चर्चेत आहे. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुख यांना मारहाण केल्यानंतर जितेंद्र आव्हाड त्यांची विचारपूस करण्यासाठी दाखल झाले होते. ज्या गुंडांनी नितीन देशमुख यांना मारहाण केली, ते मलाच मारायला विधानभवनात आले होते असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. मात्र यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या नावाची चर्चा रंगली होती. याचं कारण रोहित पवार यांनी विधानसभेत आमदार नितीन देशमुख यांचं नाव घेतलं.
"या परिसरात आमदार महत्त्वपूर्ण असतो. काही लोक बाहेरुन येऊन जे आमदार नाही, कोणी नाही त्या कार्यकर्त्यांनी विधीमंडळातील एका आमदारावर म्हणजे नितीन देशमुख यांना मारहाण केली. पलीकडेच लोक, आमदार कोणीही असलं तरी आमदाराचं संरक्षण आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण याच्यात लक्ष घालावं. नितीन देशमुखांना कोणी मारलं, कोणी मारामारी केली त्यावर आजच्या आज कारवाई करायला हवी," असं रोहित पवार सभागृहात म्हणाले. रोहित पवार यांनी चुकून आमदार नितीन देशमुख यांचा उल्लेख केल्याने त्यांना मारहाण झाल्याची चर्चा काही वेळ रंगली होती.
मारहाण झालेले नितीन देशमुख आव्हाडांचे समर्थक
मात्र मारहाण झाली ते नितीन देशमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नसून, जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आहेत. जितेंद्र आव्हाड सभागृहात भाषण करुन आल्यानंतर लॉबीत आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख यांना गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली.
"सत्तेत असणारा आमदार आव्हाडांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलतो. बदला घेण्यासाठी, आव्हाडांना मारण्यासाठी त्या आमदाराने चार-पाच गुंड, कार्यकर्ते आणले. त्यांच्याकडे पास होता का, ते आत कसे आले? हे पाहावं लागणार आहे. आव्हाडांना कोपऱ्यात घेऊन हाणामारी करायची या हेतूने लोक आले होते," असा आरोप रोहित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. यावेळी त्यांनी नितीन देशमुख यांचा आव्हाडांचे समर्थक असा योग्य उल्लेख केला.
"ही घटना अतिशय चुकीची आहे. अशा प्रकारची घटना घडणं हे योग्य नाही. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो. अध्यक्ष आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि यासंदर्भात कडक कारवाई करावी अशा प्रकारची विनंती केली आहे. अशाप्रकारे एकतर इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे विधानसभेला शोभणारं नाही. त्यामुळे याच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.